नवी मुंबई: मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्वत:चे बलिदान दिले. राज्यातील मराठा समाजाचा मोठा भाग आज पाठीमागे राहिला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असं आमच्या सरकारचे स्पष्ट मत असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केली.


ते पुढे म्हणाले की, ''सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत. स्वंतत्र्य भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचे मोर्चे निघाले आहेत. या मोर्चांचे स्वरुप मुक असले, तरी त्याचा आवाज मोठा आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे.''

किती दिवस मुख्यमंत्री राहीन माहित नाही: मुख्यमंत्री

यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीवरुनही वक्तव्य करुन अनेकांना धक्का दिला, ''किती दिवस मुख्यमंत्री राहीन याची मला पर्वा नाही. पण जेवढे दिवस राहीन परिवर्तनासाठी काम करेन,'' असेही ते यावेळी म्हणाले.

भिजत घोंगडं ठेवू नका : मुख्यमंत्री

यावेळी त्यांनी मराठा मोर्चाच्या आयोजकांना भिजत घोंगडं ठेवू नका, असे आवाहन करतानाच, राज्य सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यासाठी निर्णायक निर्णय घेण्याची सरकारची तयारी आहे. या निर्णयासाठी आम्हाला चर्चा करायची आहे. कारण थेट निर्णय जाहीर करता येत नाही. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन चर्चा करावी लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे : मुख्यमंत्री

तसेच कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी व्हायला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. यासाठी हे प्रकरण उज्वल निकम यांच्याकडे दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी योजना: मुख्यमंत्री

शासकीय महाविद्यालयात कॉलेजमध्ये कमी जागा आहेत. मात्र, दुसरीकडे धनदांडग्याच्या महविद्यालायात शिकणाऱ्या मराठा समाजातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य सरकार योजना तयार करणार, असल्याचंही त्यांनी यावेळी म्हणाले. तसेच मराठा समाजाच्या 5 लाख तरुणांना कौशल्य विकासाचं शिक्षण दिलं जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.