मुंबई : नव्या वर्षात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि सलामीवीर शिखर धवनचं संघात पुनरागमन झालं आहे. तर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.


दिल्लीत झालेल्या बीसीसीआयच्या निवड समितीच्या बैठकीत या दोन्ही संघांची घोषणा झाली. भारतीय क्रिकेटरसिकांसाठी आनंदाची बाब म्हणजे पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमरा पुन्हा संघात परतला आहे. बुमरानं सप्टेंबरपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची किंग्सस्टन कसोटी खेळल्यानंतर दुखापतीमुळे बुमरानं दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि विंडीजविरुद्धच्या मायदेशातल्या मालिकांमधून माघार घेतली होती.

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनही अंगठ्याच्या दुखापतीतून सावरल्यानं त्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेला मुकावं लागलं होतं.


रोहित, शमीला विश्रांती

टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमी दोन्ही मालिकांमध्ये खेळणार नाही. यंदाच्या वर्षातला सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेल्या शमीला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनानं घेतला आहे.

श्रीलंका आणि कांगारुंशी सामना

नव्या वर्षात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळणार आहे. 5 जानेवारीपासून या मालिकेतला पहिला सामना खेळवण्यात येईल. सर्व सामने हे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरु होतील.

पहिली टी ट्वेन्टी 5 जानेवारी (गुवाहाटी)

दुसरी टी ट्वेन्टी 7 जानेवारी (इंदूर)

तिसरी टी ट्वेन्टी 10 जानेवारी (पुणे)


श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेन्टी मालिकेसाठीचा भारतीय संघ पुढीलप्रमाणे:

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

कांगारुंविरुद्ध वन डेची लढाई

14 जानेवारीपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. मालिकेतील सर्व सामने दुपारी दोन वाजता सुरु होतील.


पहिली वन डे      14 जानेवारी   (मुंबई)

 दुसरी वन डे       17 जानेवारी   (राजकोट)

 तिसरी वन डे      20 जानेवारी   (बंगळुरु)

 

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीचा भारतीय संघ पुढीलप्रमाणे:



विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, केदार जाधव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनीष पांडे