लंडन : इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅकग्राची बरोबरी केली आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 563 विकेट घेत मॅकग्राच्या विक्रमाची बरोबर केली आहे.
भारताविरुद्ध सुरू असलेल्या शेवटच्या ओव्हलवरील पाचवा कसोटी सामना सुरू होण्याआरधी अँडरसनच्या नावे 559 विकेट होत्या. या सामन्यात पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या दोन विकेट घेत अँडरसनने मॅकग्राच्या विक्रमाशी बरोबरी केली.
2003मध्ये जिम्बाब्वे विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अॅंडरसनने 143 सामन्यात 563 विकेट्स पल्ला गाठला आहे. मात्र आपल्या शिस्तबद्ध गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असेलेल्या ग्लेन मॅकग्राने अवघ्या 124 सामन्यात हा 563 विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा विक्रम श्रीलंकेचा गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्न 708 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताचा अनिल कुंबळे या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. कुंबळेने 132 सामन्यात 619 विकेट घेतले आहेत.