किंगस्टन : रिओ ऑलिम्पिकपूर्वीच जमैकाला मोठा धक्का बसला आहे. कारण वेगाचा बादशाह उसैन बोल्टला दुखापत झाली आहे. त्याने जमैकाच्या राष्ट्रीय चॅम्पियन्सशीपमधून माघार घेतली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बोल्ट उतरणार का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
बोल्टच्या मांडीला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र तो या दुखापतीवर मात करुन रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
जमैकामध्ये शुक्रवारी ऑलिम्पिक पात्रता फेरी घेण्यात आली. यामध्ये बोल्ट 100 मीटर फायनलसाठी पात्र ठरला होता. 200 मीटरसाठी शनिवार आणि रविवारी पात्रता फेरी होती. मात्र त्यापूर्वीच त्याच्या दुखापतीने उचल खाल्ली.
बोल्टने 100 मीटर रेसमध्ये 2008 च्या बीजिंग आणि 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्येही सुवर्ण पदक पटकावलं आहे. यंदाही अशीच कामगिरी करुन हॅटट्रिक साधण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मात्र आता त्याच्या खेळण्याबाबतच साशंकता व्यक्त होत आहे.
100 मीटर रेसमध्ये सलग तीनवेळा कोणीही सुवर्णपदक पटकावलेलं नाही. हा विक्रम मोडण्याची तयारी बोल्टने केली होती.