बांगलादेशात कॅफेवर गोळीबार, 20 जणांना ओलिस ठेवल्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 06:21 PM (IST)
ढाका : बांगलादेशची राजधानी ढाकामधील एका कॅफेमध्ये हल्ला झाला आहे. 9 ते 10 बंदुकधाऱ्यांच्या गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. तर 20 जणांना ओलिस ठेवल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. गुलशन परिसरात आज रात्र साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. ज्या कॅफेवर हल्ला करण्यात आला, तिथे प्रामुख्याने परदेशी नागरिकांचा वावर असतो. तसंच इथे परदेशी राजकीय अधिकाऱ्यांचीही ये-जा असते. हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण या हल्ल्यामागे संशयित इस्लामिक अतिरेकी असण्याची शक्यता आहे. ज्या परिसरात हा हल्ला झाले तिथे भारतीय दूतावास आहे. दरम्यान दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ओलिसांना सोडवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचं ऑपरेशन सुरु आहे. गेल्या काही महिन्यांत बांगलादेशात धर्मनिरपेक्ष ब्लॉगर्स, लेखक-पत्रकार धार्मिक अल्पसंख्यांक आणि परदेशी नागरिकांवर वारंवार हल्ले झाले आहेत.