जयपूरचा दिल्लीवर दणदणीत विजय, सामन्यात तब्बल 51 गुणांची लयलूट
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2016 06:31 PM (IST)
राजेश नरवाल, जसवीरसिंग आणि अमित हूडा यांनी गुणांची लयलूट करून प्रो कबड्डी लीगच्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सला दबंग दिल्लीवर 51-26 असा दणदणीत विजय मिळवून दिला. जयपूरचा हा सहा सामन्यांमधला तिसरा विजय ठरला. तीन विजय, दोन पराभव आणि एक बरोबरी अशा कामगिरीसह जयपूरनं वीस गुणांची कमाई करून गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. दबंग दिल्लीचा हा पाच सामन्यांमधला तिसरा पराभव ठरला. काशिलिंग आडकेच्या या टीमनं पाच सामन्यांमध्ये एक विजय, तीन पराभव आणि एक बरोबरी अशा कामगिरीसह नऊ गुणांचीच कमाई केली आहे. दबंग दिल्ली गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.