चेन्नई: कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं इंग्लंडवर कसोटी मालिकेत 4-0नं दणदणीत विजय मिळवून एक नवा इतिहास रचला. या मालिका विजयानंतर कोहलीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. 'एक संघ म्हणून 2016 हे वर्ष आमच्यासाठी खरंच चांगलं होतं. फक्त आम्हाला दोन धक्के बसले. एक ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका आणि दुसरा टी-20 विश्वचषक. आम्ही आशिया चषक पटकावला. न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि कसोटी मालिका जिंकली.'
'नेहमी अशाप्रकारची कामगिरी करण्याचं आव्हान आमच्यासमोर असणार आहे. ही फक्त सुरुवात आहे. आम्हाला जे मिळवायचं आहे त्याची आता कुठे सुरुवात झाली आहे. अजून बराच पल्ला बाकी आहे.' असं कोहली म्हणाला.
दरम्यान, सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला की, 'अनेक खेळाडू दबाव घेऊ शकत नाही. पण जर तुम्ही दबाब घेण्यासाठी तयार असाल तर तुम्ही नक्कीच संघात आपली जागा तयार करता. युवा खेळाडूही खूप स्मार्ट आहेत आणि मैदानावरील त्यांच्या खेळातून ते दिसूनही येतं.'