पुणे : लग्न म्हटलं की मौज मजा आलीच. मात्र पुण्याचे ज्ञानेश देव आणि सुवर्णा काळंगेच्या बाबतीत वेगळाच योग होता. 18 डिसेंबरला या दोघांचंही लग्न होणार होतं. मात्र लग्नाआधी ज्ञानेशच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि आयसीयूमध्येच उपचार सुरु असताना तब्येत आणखी ढासळली.
एकीकडे लग्न आणि दुसरीकडे वडील जीवन मरणाच्या उंबरठ्यावर होते. त्यामुळे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या आयसीयूमध्येच लग्न पार पडलं. मात्र मुलाचं लग्न पाहताच काही तासातच नंदकुमार देव यांची प्राणज्योत मालवली.
अगदी साध्या पद्धतीने लग्न पार पडलं. रुग्णालय हा संवेदनशील भाग आहे. त्यामुळे केवळ एक दोन विधी पार पाडत कुणालाही त्रास न होता हार घातले. विशेष म्हणजे अशा परिस्थितीतही वधूच्या घरच्यांनी ज्ञानेशच्या कुटुंबियांना साथ दिली.
मोठी हॉस्पिटल्स माणुसकी विसरतात असं आपण ऐकतो. पण दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने देव कुटुंबियांच्या भावनेला साथ दिली आणि थेट आयसीयूमध्येच लग्नास परवानगी दिली.
रुग्णालयातल्या बेडवरुन मनातूनच आशीर्वादाची थाप मुलाच्या आणि सुनेच्या डोक्यावर पडली आणि ज्ञानेशच्या वडिलांनी जगातून निरोप घेतला. मात्र त्याआधी मृत्यूलाही काही तास थांबावं लागलं हे ही तितकच खरं..