पुटियान : चीनमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजीत भारतानं आज तीन सुवर्णपदकांची कमाई केली. यात भारताची युवा नेमबाज मनू भाकर, एलावेनील वेलारिवन आणि दिव्यांश सिंग पानवरनं सोनेरी कामगिरी नोंदवली. मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये तर वेलारिवननं 10 मीटर्स एअर रायफलचं सुवर्णपदक पटकावलं. पुरुष गटात दिव्यांश सिंग पानवरनं 10 मीटर्स एअर रायफलमध्येच सुवर्णवेध घेतला. दरम्यान या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या मनू भाकरचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत अभिनंदन केलं आहे.


विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकरनं महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. तिनं 244 पूर्णांक सात दशांश गुण मिळवत अव्वल स्थान मिळवलं. सर्बियाच्या झोराना अरुनोविचनं रौप्य तर चीनच्या क्वियान वँगनं कांस्य पदक पटकावलं.


सर्बियाच्या झोराना अरुणोविकने 241.9 गुण मिळवत रौप्यपदक जिंकले, तर चीनच्या क्वान वांगने 221.8 गुणांसह कांस्यपदक जिंकले. मात्र, भारताच्या यशस्विनी सिंग देसवालला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वर्माने 588 गुणांसह प्रथम स्थान पटकाविला तर चौधरी 581 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत.


आंतरराष्ट्रीय शुटींग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) या वार्षिक स्पर्धेत रायफल आणि पिस्तुल नेमबाजी प्रकारात जगातील विविध देशांचे अव्वल नेमबाज सहभागी झाले आहेत. याच धर्तीवर गेल्या ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये शॉटगन स्पर्धा घेतली गेली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय नेमबाज संघाला जसपाल राणा यांचे मार्गदर्शन मिळत आहे. गेल्यावर्षी ही स्पर्धा दक्षिण कोरियात घेण्यात आली होती.