यवतमाळ : नागपूर हैदराबादकडे सुसाट वेगाने जाणाऱ्या जॅग्वार गाडीचा पिंपळखुटी गावाजवळ अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्ती तेलंगणा येथील रहिवाशी आहेत.


जॅग्वार गाडीमधून सर्व प्रवासी नागपुरहून हैद्राबाद येथे जात असताना त्यांच्या गाडीला हा अपघात झाला. नागपूर-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग असून यावर अनेक मोठे खड्डे आहेत. खड्यांमुळे रस्त्यांची चक्क चाळण झाली आहे. त्यामुळे गाडी सुसाट जात असतानाच मध्ये आलेल्या खड्यांमुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. अपघात एवढा गंभीर होता की, गाडी घटनास्थळावरून रस्त्याजवळच असलेल्या शेतात 20 फुट खाली जाऊन आदळली. या अपघातात योगेश गुप्ता आणि पटाली किशोर कुमार कृष्णाचार्य यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पिंपळखुटी गावाजवळ हा अपघात झाला. अपघातातील जखमींना उपचारासाठी अदीलाबाद येथील स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी पांढरकवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.