गोवा : इंडियन सुपर लीग 2020-21 च्या अंतिम सामन्यात शनिवारी (13 मार्च) मुंबई सिटी एफएसीने एटीके मोहन बागानच्या संघाचा 2-1 ने पराभव केला. गोव्याच्या फोर्टोर्डा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बिपीन सिंगने मुंबईसाठी निर्णायक गोल केला.


पेनल्टी शूटआऊटमध्ये मुंबई सिटी एफसीने उपांत्य फेरीत गोवा एफसीचा 6-5 असा पराभव केला, तर मोहन बागानने नॉर्थईस्ट युनायटेडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.


संपूर्ण हंगामात, यापूर्वी दोन्ही संघांनी 12 सामने जिंकले आहेत, तर चार सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघात मुंबईचा संघ एटीकेएमबीवर भारी पडला. लीग टेबलमध्ये अव्वल स्थानी राहिल्यामुळे मुंबईने आशियाई चॅम्पियन्स लीगमध्येही स्थान मिळवले आहे.


या पराभवामुळे एटीके मोहन बागान संघाचे चौथ्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. या संघाचे नाव अ‍ॅटलेटिको डी कोलकाता असे होते तेव्हा 2014, 2016 आणि 2020 मध्ये विजेतेपद जिंकले होते. दुसरीकडे, मुंबई सिटी एफसीची टीम प्रथमच अंतिम सामन्यात खेळत होती. त्यामुळे मुंबई सिटी एफसीचं हे पहिलचं जेतेपद आहे.


यापूर्वीचे विजेते संघ


2014: अ‍ॅट्लेटिको डी कोलकाता
2015: चेन्नईन एफसी
2016: अ‍ॅट्लेटिको डी कोलकाता
2017-18: चेन्नईन एफसी
2018-19: बेंगळुरू एफसी
2019-20: अ‍ॅट्लेटिको डी कोलकाता
2020-21: मुंबई सिटी एफसी