नवी दिल्ली : दुखापतीमुळे दिल्ली रणजी संघाचा कर्णधार इशांत शर्मा महत्त्वपूर्ण सामन्याला मुकणार आहे. 17 डिसेंबरला पुण्यात पश्चिम बंगालविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलमध्ये त्याला खेळता येणार नाही.
इशांत शर्माला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीने पुन्हा उचल खाल्ली आहे. भारतीय संघाचे कसोटी खेळाडू मोहम्मद शमी आणि रिद्धीमान साहा बंगालकडून खेळतील.
''इशांत शर्माच्या घोट्याला दुखापत झाली असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी ही दुखापत गंभीर होऊ नये, यासाठी तो काळजी घेत आहे. दिल्लीचा संघ इशांत शर्माशिवायच पुण्याला रवाना झाला आहे'', अशी माहिती दिल्ली संघ व्यवस्थापनाने दिली.
बीसीसीआयने खेळाडूंना आपापल्या राज्यांसाठी रणजी सामने खेळण्याची परवानगी दिलेली आहे. इशांत शर्मा दिल्ली संघाचं नेतृत्त्व करतो. त्याच्या जागी आता सेमीफायनलमध्ये दिल्लीची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर असेल.