मुंबई : एबीपीने ज्या सीएसडीएससोबत एक्झिट पोल केला आहे, त्याच सीएसडीएसने (सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) देशातील पहिला एक्झिट पोला केला होता. तेव्हा टी. एन. शेषन निवडणूक आयुक्त होते. हा एक्झिट पोल दूरदर्शनसाठी करण्यात आला होता.

एक्झिट पोल कसा असतो?

प्रत्येक निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर तुम्ही एक्झिट पोल पाहत असाल. मात्र मतदानोत्तर जनमत चाचणी म्हणजेच एक्झिट पोल नेमका कसा केला जातो, एक्झिट पोल म्हणजे काय, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एक्झिट पोल मतदानाच्या दिवशीच केला जातो. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं हे विचारलं जातं. त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत, याची माहिती अगोदरच घेतलेली असते, त्यानुसार ठराविक मतदार केंद्र निवडली जातात. सांख्यिकी पद्धतीने मतदान करुन येणारा पंधरावा माणूस, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. त्याचं विश्लेषण करुन आकडेवारी निश्चित करतात.

#ABPEXITPOLL -  गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी!

प्रत्येक मतदारसंघातलं कोणतं मतदान केंद्र निवडायचं हे सांख्यिकी पद्धतीनेच (सॅम्पल सिलेक्शन) ठरवलं जातं. मतदान करुन आल्यानंतर तुमच्यावर पहिला अर्धा तास प्रभाव कायम असतो की, तुम्ही कुणाला मतदान केलंय. त्यामुळे तिथे खरं उत्तर दिलं जातं, याला मानसशास्त्रीय आधार असल्याचं मानलं जातं.

ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमध्ये फरक काय?

मतदानापूर्वी सादर केला जातो तो ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी असते, तर मतदानानंतर होणाऱ्या मतदानोत्तर चाचणीला एक्झिट पोल म्हणतात. मतदानापूर्वी विविध मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांकडून प्रश्नावली भरुन घेऊन त्यांचा कल जाणून घेतला जातो, त्याला ओपिनियन पोल म्हणतात.

ओपिनियन पोलचे अंदाज बदलू शकतात, कारण तो मतदानापूर्वी घेतला जातो. तर एक्झिट पोल हा निकालाच्या जवळ जाणारा असू शकतो, कारण तो मतदान केल्यानंतर काही वेळातच जाणून घेतला जातो.

भारतातला पहिला एक्झिट पोल कसा झाला होता?

भारतात 1996 साली पहिला एक्झिट पोल करण्यात आला. याला प्रशासनानेही पुरेपूर सहकार्य केलं होतं. एका ठराविक वारंवारतेने येणाऱ्या ठराविक मतदाराला सांगितलं जायचं, की तुमच्यासाठी आणखी एक मतदान आहे. त्यानुसार त्यांच्याकडून डमी बॅलेट पेपरवर शिक्का मारुन घेतला जायचा. अगोदर ज्याला मतदान केलं, त्यालाच इथेही करा असं सांगितलं जायचं. अशा पद्धतीने पहिला एक्झिट पोल केला गेला.

देशातील आघाडीचे निवडणूक तज्ञ योगेंद्र यादव यांचा पहिल्या एक्झिट पोलमध्ये मोलाचा वाटा होता.

संबंधित बातम्या :

गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी


हिमाचलमध्ये भाजप बहुमताने सत्तेत, चाणक्यचा एक्झिट पोल