नवी दिल्ली : आयपीएल 2017 मधून करारमुक्त केलेल्या खेळाडुंमध्ये आता भारताचा गोलंदाज इशांत शर्मा, इंग्लंडचा फलंदाज केविन पीटरसन आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज डेल स्टेन यांचाही समावेश झाला आहे.


आठ आयपीएल फ्रेंचायझींनी 44 परदेशी खेळाडुंसह 140 खेळाडूंना कायम केलं असून 36 खेळाडुंना करारमुक्त केलं आहे.

इशांत शर्माला दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर रहावं लागलं. त्याला आयपीएल 9 मध्ये पुणे सुपरजायंट्सने 3.8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.

पुणे सुपरजायंट्सने एकूण 11, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 10 आणि कोलकाता नाईट रायडर्सने 9 खेळाडुंना करारमुक्त केलं आहे.

पीटरसनची पुणे संघाने 3.5 कोटी तर स्टेनची गुजरात लायन्स संघाने 2.3 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती.

दुखापतीमुळे पीटरसनला आयपीएलमध्ये खेळता आलं नाही. त्याला पुणे संघाने इशांत शर्मा, ऑल राऊंडर इरफान पठाण आणि स्पिनर मुरुगन आश्विन यांच्यासोबत करारमुक्त केलं आहे.

आयपीएलच्या नवव्या मोसमासाठी सर्वात जास्त बोली लागल्याने चर्चेत आलेला खेळाडू पवन नेगीला दिल्ली डेअरडेव्हिल्सने करारमुक्त केलं आहे. नेगीसह दिल्लीने आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी आणखी पाच खेळाडूंना करारमुक्त केलं.

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज इम्रान ताहिर, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नाथन कोल्टर नाईल, मुंबईचा सलामीवीर रणजी खेळाडू अखिल हेरवादकर, महिपाल लोमरोर आणि दिल्लीचा रणजीपटू पवन सुयाल यांना संघातून करारमुक्त केलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

केकेआरने जेसन होल्डर, कोलिन मुनरो, जॉन हेस्टिंग्स, ब्रॅड हॉग या परदेशी खेळाडुंना तर सनरायझर्स हैदराबादने ट्रेंट बोल्ट, आशिष रेड्डी आणि मॉर्गन यांना करारमुक्त केलं आहे.

करारमुक्त केलेल्या खेळाडुंमध्ये ऑस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सन (किंग्ल इलेव्हन पंजाब), दक्षिण आफ्रिकेचा मॉर्ने मॉर्केल (केकेआर), न्यूझीलंडचा कोरी अँडरसन आणि मार्टिन गप्टील (मुंबई इंडियन्स), ऑस्ट्रेलियाचा नाथन कोल्टर नील (दिल्ली डेअरडेव्हिल्स) आणि इंग्लंडचा वन डे कर्णधार इयॉन मॉर्गन (सनरायझर्स हैदराबाद) यांचा समावेश आहे.

संबंधित बातमी :

IPL 10 मधून दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून नेगी करारमुक्त