नवी दिल्ली : जुन्या नोटा अकाऊंटमध्ये भरण्याची अखेरची तारीख जवळ येताच केंद्र सरकारनं आणखी एक धक्का दिला आहे. 30 डिसेंबरपर्यंत जुन्या चलनाच्या स्वरुपात 5 हजारांपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जमा करता येणार नाही.


30 तारखेपर्यंत तुम्ही फक्त पाच हजारांपर्यंतच्याच जुन्या नोटा खात्यात भरु शकणार आहात. तुम्ही एकरकमी पाच हजार भरा, किंवा रोज काही नोटांच्या स्वरुपात, 30 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यात पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम भरता येणार नाही.

अपवादात्मक स्थितीत पाच हजारांपेक्षा जास्तीची रक्कम स्वीकारण्यात येईल. मात्र तुम्ही आतापर्यंत जुन्या नोटा का भरु शकला नाहीत, याचं स्पष्टीकरण दोन बँक अधिकाऱ्यांच्या साक्षीने द्यावं लागेल. बँकेला ग्राहकाचं उत्तर रेकॉर्डवर ठेवणं बंधनकारक राहील.

करंट अकाऊंटमध्ये रोजच्या रोज जुन्या 50 हजारांचा भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्यासाठी करंट अकाऊंटचा वापर होत असल्याचं समोर येताच सरकारनं हा नवा निर्णय जाहीर केला आहे.

चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजारच्या नोटांची पाच हजारापेक्षा कमी रक्कम भरण्यावर कुठलीही आडकाठी नाही. त्याचप्रमाणे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पैसे जमा करण्यावरही कोणतीही बंदी नाही.

https://twitter.com/RBI/status/810742717231734784