BCCI Central Contract : बीसीसीआयने मोठी कारवाई करत इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय कराराच्या यादीतून काढून टाकले आहे. सतत इशारे देऊनही इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष केले. आता हे दोन्ही खेळाडू बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत नाहीत. बीसीसीआयने केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंची नवी यादी जाहीर केली आहे.






विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय रवींद्र जडेजालाही A+ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंना बीसीसीआयकडून वर्षाला 7 कोटी रुपये मानधन दिले जाते. 6 खेळाडूंना ए ग्रेडमध्ये, 5 खेळाडूंना बी ग्रेडमध्ये, तर 15 खेळाडूंना सी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे.






ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्या वृत्तीमुळे बीसीसीआय संतापले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर किशनला सातत्याने पुनरागमन करून रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. पण किशनने बीसीसीआयकडे दुर्लक्ष केले आणि झारखंडच्या एकाही रणजी सामन्यात भाग घेतला नाही. राष्ट्रीय कर्तव्यावर नसलेल्या सर्व खेळाडूंना रणजी स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.






मात्र, श्रेयस अय्यर वेगळ्याच वादात अडकला. खराब कामगिरीमुळे अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. रणजी ट्रॉफी न खेळण्यासाठी अय्यरने दुखापतीचे कारण पुढे केले. पण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने अय्यरचा खोटारडेपणा उघड केला. एनसीएने स्पष्ट केले की अय्यर मॅच फिट आहे आणि त्याला खेळण्यात कोणतीही अडचण नाही.






केंद्रीय करारातून बाहेर पडल्यानंतर आता टीम इंडियातील अय्यर आणि किशनचे भवितव्यही धोक्यात आले आहे. ज्या खेळाडूंना खेळण्याची भूक नाही अशा खेळाडूंवर संघ व्यवस्थापन आपला वेळ वाया घालवणार नाही, असे रोहित शर्माने नुकतेच स्पष्ट केले आहे. या दोन खेळाडूंवर कारवाई करून बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटकडे कोणत्याही किंमतीवर दुर्लक्ष करता येणार नाही, असा संदेशही दिला आहे.






इतर महत्वाच्या बातम्या