Irfan Pathan On Rohit Sharma : महेंद्रसिंग धोनी जसा चेन्नई सुपर किंग्जसाठी आहे तसाच रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी आहे. असं टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचं (Irfan Pathan On Rohit Sharma) म्हणणं आहे. इरफान पठाण म्हणाला की, रोहित शर्माने ज्या प्रकारे मुंबई इंडियन्स संघाची बांधणी केली आणि 5 वेळा विजेतेपद पटकावले ते कौतुकास्पद आहे. तो पुढे म्हणाला की, रोहित शर्मा ही मुंबई इंडियन्ससाठी मोठी व्यक्ती आहे. कर्णधार म्हणून, रोहित शर्माने आपल्या रक्त आटवून संघाची उभारणी केली आहे, त्याने खूप योगदान दिले आहे, तो नेहमी संघाच्या मीटिंगमध्ये सामील असतो.
'रोहित शर्मा अप्रतिम कर्णधार, गोलंदाजांचा कर्णधार'
इरफान पठाण म्हणाला की, रोहित शर्मा एक अप्रतिम कर्णधार आहे, गोलंदाजांचा कर्णधार आहे. गेल्यावर्षी जोफ्रा आर्चरचा फॉर्म आणि जसप्रीत बुमराह संघात नसतानाही, रोहितने कर्णधार म्हणून आयपीएलचा हंगाम चांगला गाजवला. तसेच, इरफान पठाणने हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदी नियुक्तीचे कौतुक केले. सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मासारखे दिग्गज खेळाडू असलेल्या संघाचे नेतृत्व करणे हार्दिक पांड्यासाठी आव्हान असेल, असे माजी भारतीय अष्टपैलू खेळाडूने सांगितले.
'रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी मोठा वारसा सोडत आहे'
इरफान पठाण म्हणाला की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी जो वारसा सोडत आहे तो विलक्षण आहे. आयपीएल 2024 च्या हंगामापूर्वी, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी अष्टपैलू हार्दिक पांड्याला आपला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. अलीकडेच मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्ससोबत 15 कोटी रुपयांमध्ये ट्रेड केले होते.
मुंबई इंडियन्सला चक्क श्रद्धांजली वाहण्याचा ट्रेंड!
दरम्यान, आयपीएलचा मिनी लिलाव उद्या 19 डिसेंबर रोजी दुबईत होत आहे. मात्र, या लिलावापूर्वी सोशल मीडियात मुंबई इंडियन्सविरुद्ध संताप सुरुच आहे. ट्विटरवर #RIPMumbaiIndians ट्रेंड होत आहे. यामध्ये चाहते जर्सीला टांगून गळफास देत आहेत. काहींनी संघाची जर्सी जाळून टाकली आहे. काहींनी मुंबई इंडियन्सचे कार्ड कात्रीने कापून संताप व्यक्त केला आहे. इतकंच नाही, तर सोशल मीडियातून मुंबई संघाचे फाॅलोअर्स कमालीचे कमी झाले आहेत. रोहित शर्मा आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू शकतो, असे सोशल मीडियावरील अनेकांना वाटते.
इतर महत्वाच्या बातम्या