IPL 2020 | यंदाच्या मोसमात जबरदस्त फार्मात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता हा सामना अबुधाबीच्या मैदानावर होणार आहे. दिल्लीचा संघ आपलं प्ले ऑफमधलं स्थान पक्क करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे कोलकाता देखील प्ले ऑफमधील रेसमध्ये कायम राहण्यासाठी हा सामना जिंकण्यास उत्सुक आहे. कोलकात्याचा तगडा खेळाडू आंद्रे रसेल जखमी झाल्यानं तो आज खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

दिल्लीला गेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने पराभूत केले. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन तुफान फॉर्मात असून गेल्या दोन सामन्यांत त्याने नाबाद शतकं झळकावली आहेत. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने साथ देण्याची आवश्यकता असून कर्णधार अय्यरसह ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांच्या कामगिरीकडं लक्ष असणार आहे.

दुसरीकडे इऑन मॉर्गनच्या कोलकाताला विराटच्या बंगलोरविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. कोलकाता संघाला शुभमन गिल, नितीश राणा यांच्याकडून अपेक्षा आहेत. अनुभवी दिनेश कार्तिकलाही छाप पाडता आलेली नाही.

दिल्ली आणि कोलकातादरम्यान झालेल्या या हंगामातील मागील सामन्यात कोलकात्याचा दिल्लीने 16 धावांनी पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने आज कोलकाता मैदानात उतरणार आहे. सोबतच दोन गुण वाढवत प्ले ऑफसाठी आपलं स्थान मजबूत करण्याचा कोलकात्याचा इरादा असेल.

दोन्ही संघांचा याआधीच्या सामन्यात पराभव झाला आहे. दिल्लीला पंजाबविरुद्ध पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर कोलकात्याला बंगलोरविरुद्ध आठ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात कोलकात्याला केवळ 84 धावाच करता आल्या होत्या. आता आजच्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने उतरणार आहेत.