दापोली (रत्नागिरी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. आमदार योगेश कदम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. खासदाराविरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकार एकत्रित असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.


रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तटकरे दापोली विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमांना आपल्याला निमंत्रण देत नाहीत. तसंच आपल्याला विश्वासात न घेता कार्यक्रम करत असल्याचे कारण देत आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे.


मंडणगड तालुक्यातील पुलासाठी तटकरेंसोबत आपणही प्रयत्न केले. कार्यारंभ आदेश येण्याआधीच यांनी भूमिपूजन उरकलं. स्थानिक आमदार असूनही आपल्याला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नाही किंवा भूमिपूजनाच्या फलकावर नावही टाकलं नाही, असा आरोप योगेश कदम यांनी केला आहे. तटकरे यांचं हे राजकारण गंभीर असून आपल्या हक्कांवर गदा आणणारं आहे, असं सांगत आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव पाठवला आहे.


योगेश कदम यांचे आरोप काय?
योगेश कदम यांनी आरोप केला आहे की, "माझ्या दापोली मतदारसंघात काही दिवसांपूर्वी भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले. खासदार तटकरे उपस्थित होते. त्या कार्यक्रमांचं निमंत्रण मला नव्हतं. हा श्रेयवादाचा विषय नाही. पण माझ्या मतदारसंघात मला डावलून भूमिपूजन करणं हे आमदार म्हणून माझ्या हक्कांवर गदा आणणारं आहे. हे सहन करण्याच्या पलिकडे गेलं आहे. भूमिपूजन करताना त्या फलकावर माझ्या नावाचा उल्लेख करत नाही. मला कुठल्याही कार्यक्रमाचं निमंत्रण नाही. मला वाटतं जाणूनबुजून डावलण्याचं काम त्यांच्याकडून झालं. त्यामुळे मी ही भूमिका घेतली. जे घडलं ते अपेक्षित नव्हतं. सुनील तटकरे यांच्या आढावा बैठकांनाही निमंत्रण दिलं जात नाही. याआधीही खेड नगरपरिषदेच्या हद्दीतही चिपळूणच्या आमदारांनी येऊन उद्घाटन केलं, पण मला निमंत्रण नव्हतं. जाणूनबुजून होत असेल तर मला माझी भूमिका स्पष्ट करावी लागेल."


दरम्यान, योगेश कदम यांच्या आरोपांवर खासदार सुनील तटकरे यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.