IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची मालिका कायम आहे. शुक्रवारी मुंबईकडून झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर पडली आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई टीम प्ले ऑफमध्ये खेळताना दिसणार नाही. तसेच आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागलाय.
तीन वेळा आयपीएल जिंकणारी चेन्नईची टीम सर्वात मजबूत मानली जाते. मात्र यंदा 11 पैकी 8 सामने चेन्नईने गमावले आहेत. आता पुढचे तीनही सामने जिंकले तरी चेन्नई प्ले ऑफमध्ये स्थान मिळवू शकणार नाही. 2008 पासून आयपीएल सुरु झाल्यापासून ही पहिली वेळ आहे ज्यावेळी चेन्नई टीम प्ले ऑफमध्ये खेळताना दिसणार नाही.
यावर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं या गोष्टीमुळं त्रास होत असल्याचं म्हटलं आहे. तसंच हे वर्ष आमचं नाही, असंही धोनी म्हणाला. तो म्हणाला की, सीएसकेसाठी सगळं गडबड सुरुय. ज्या सामन्यात आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करण्याचं ठरवलं, त्यावेळी आम्ही टॉस हरलो.
मुंबई इंडियन्सकडून चेन्नई सुपर किंग्सचा 10 विकेट्सनी धुव्वा
शारजाच्या मैदानात काल मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला. मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा सातवा विजय ठरला. या सामन्यात चेन्नईनं मुंबईसमोर अवघं 114 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईच्या ईशान किशन आणि क्विंटन डी कॉक या जोडीनं अभेद्य सलामी देत हे आव्हान 13व्या षटकातच पार केलं. ईशान किशननं 37 चेंडूत नाबाद 68 तर डी कॉकनं नाबाद 46 धावा फटकावल्या.
चेन्नईच्या फलंदाजांचा फ्लॉप शो
त्याआधी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नईची आघाडीची फळी पत्त्याप्रमाणे कोसळली. पहिल्याच षटकात सलामीवीर ऋतुराज गायकवाड खाते न उघडताच बाद झाला. यानंतर अंबाती रायुडू संघाची धावसंख्या तीन असताना अवघ्या एका धावसंख्येवर माघारी परतला. त्याच्या पुढच्या बॉलवर नारायण जगदीसनही खाते न उघडताच तंबूत परतला. जसप्रीत बुमराहने सलग दोन चेंडूत या दोघांनाही बाद केले. तीन धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स पडल्यानंतर चेन्नईचा डाव पत्त्यांप्रमाणे कोसळू लागला. पुढच्याच षटकात शानदार फॉर्ममध्ये असलेला फाफ डू प्लेसिसही एका धावसंख्येवर बाद झाला. यानंतर रवींद्र जडेजाही 21 धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. जडेजाने सहा चेंडूत सात धावा केल्या. निम्मा संघ 21 धावांमध्ये गारद झाल्यानंतर एमएस धोनीने आरामात खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो चहरच्या लेगस्पिनवर झेलबाद झाला. धोनीने 16 चेंडूत 16 धावा केल्या. यात त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला.
IPL 2020 : राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा मंदावल्या; पॉईंट टेबलची स्थिती काय?
चेन्नईची एकवेळ सहा बाद 30 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण सॅम करननं तळाच्या फलंदाजांच्या साथीनं चेन्नईचा डाव सावरला. करननं 47 चेंडूत 52 धावांची खेळी केली. करन आणि ताहीरनं नवव्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी रचली. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातली ही नवव्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली. या भागीदारीमुळे चेन्नईला 9 बाद 114 धावांची मजल मारता आली. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टनं 18 धावात 4 फलंदाजांना माघारी धाडलं. तर बुमरा आणि राहुल चहरनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात मुंबईने अवघ्या 12.2 षटकांत एकही गडी न गमावता लक्ष्य सहज साध्य केलं. या मोसमात पहिल्यांदाच सलामीला आलेल्या मुंबईच्या इशान किशनने 37 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. या खेळीत सहा चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. तर क्विंटन डिकॉकने 37 चेंडूत नाबाद 46 धावा फटकावल्या.
मुंबई गुणतालिकेत टॉपवर
मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा 10 सामन्यातला सातवा विजय ठरला. त्यामुळे 14 गुणांसह मुंबईचा संघ आता टॉपवर पोहोचला आहे. मुंबईला आता बाद फेरी गाठण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.