मुंबई: टीम इंडियाचा शिलेदार रवींद्र जाडेजा हा खऱ्या अर्थानं बहुगुणी क्रिकेटर असून, त्याचा पर्याय शोधणं हे कोणत्याही संघाच्या दृष्टीनं आव्हानात्मक असल्याची भावना गुजरात लायन्सचा मुख्य प्रशिक्षक ब्रॅड हॉजनं व्यक्त केली आहे.
रवींद्र जाडेजाला बीसीसीआयच्या मेडिकल टीमनं किमान दोन आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळं आयपीएलमधल्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये जाडेजा गुजरात लायन्सचं प्रतिनिधित्व करू शकणार नाही.
त्यामुळं रवींद्र जाडेजाचा पर्याय कोण, असा प्रश्न ब्रॅड हॉजला विचारण्यात आला होता. त्यावर जाडेजाला पर्याय मिळणं अवघड नाही, तर अशक्यच आहे असं उत्तर हॉजनं दिलं.
जाडेजा हा बहुगुणी क्रिकेटर आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर तो अतिशय गुणवान आहे. अशा बहुगुणी क्रिकेटरचा पर्याय कुठून शोधायचा, असं सांगून हॉज यांनी आपली असमर्थता व्यक्त केली.