मुंबई : दहावी, बारावीच्या पेपरफुटीचं सत्र आता आठवीच्या बेसलाईन परीक्षेपर्यंत येऊन ठेपलं आहे. आठवीच्या इंग्रजी आणि गणित विषयाचा पेपर दोन दिवस आधीच व्हॉट्सअॅपवर लीक झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


मूल्यांकनाची तिसरी फेरी 6 आणि 7 एप्रिलला नियोजित केली होती. मात्र ही परीक्षा आता 10 आणि 11 एप्रिलला होणार आहे.

2015 पासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक चाचणीसाठी राज्यभरात ही बेसलाईन परीक्षा घेण्यात येते. इयत्ता आठवीच्या इंग्रजी आणि गणित विषयाचा पेपर परीक्षेच्या दोन दिवस आधीच व्हॉट्सअॅपवर फिरु लागल्यानं अनेक विद्यार्थ्यांच्या हाती पडला.

परीक्षा आयोजित करणाऱ्या एससीईआरटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, पेपर लीक ही तितकीशी गंभीर बाब नाही. विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षी शिकवलेल्या विषयांचं आकलन किती आहे, हे समजण्यासाठी परीक्षेची मदत होते. त्यातील गुणांचा थेट संबंध चालू शैक्षणिक वर्षाशी नसतो.

ऑक्टोबर 2016 मध्येही या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेच्या प्रती काही जण 20 ते 30 रुपयांना विकत असल्याची तक्रार पालकांनी केली होती.