जयपूर : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात गुणतक्त्यात सर्वात शेवटी असलेल्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन संघांमध्ये झालेला आजचा सामना राजस्थानने जिंकला. तर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला आयपीएलच्या रणांगणात सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थान रॉयल्सने बँगलोरचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, चौथ्या सामन्यात आपला पहिला विजय साजरा केला.

आजच्या सामन्यात बँगलोरने दिलेले 159 धावांचे आव्हान राजस्थानने सात विकेट्स आणि एक चेंडू राखून पूर्ण केले. राजस्थानच्या विजयात जॉस बटलरने 43 चेंडूत 59 धावांची खेळी करुन निर्णायक भूमिका बजावली. त्याला राहुल त्रिपाठीने (23 चेंडूत 34 धावा)चांगली साथ दिली. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे(20 चेंडूत 22 धावा) पुन्हा एकदा अपयशी ठरला. तर बँगलोरकडून यजुवेंद्र चहलने 4 षटकात 17 धावा देत 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी बँगलोरकडून पार्थिव पटेलने सलामीला येऊन 67 धावांची खेळी करत बँगलोरला 20 षटकांत चार बाद 158 धावांची मजल मारुन दिली होती. पार्थिव व्यतिरिक्त बँगलोरच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. कर्णधार विराट कोहली 25 चेंडूत 23 धावा करुन बाद झाला. विराट आज खूप तणावात खेळत असल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकात मॉर्कस स्टॉनिसने सावधपणे फलंदाजी करत 28 चेंडूत 31 धावा करुन बँगलोरला 150 धावांचा टप्पा पार करुन दिला. राजस्थानकडून श्रेयस गोपालने चांगली गोलंदाजी केली. गोपालने 4 षटकात केवळ 12 धावा देत 3 बळी घेतले.