Yuvraj Singh on Virat Kohli : मागील काही दिवसांपासून विराट कोहलीवर (Virat Kohli)  फॉर्म रुसला आहे. त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. मागील दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला पण विराटच्या बॅटमधून शतकही निघाले नाही. विराटही फॉर्ममध्ये परतण्यासाठी प्रयत्न करतोय. त्याला अनेक दिग्गजांनी सल्लेही दिले आहेत. यामध्ये आता भारताचा माजी अष्टपैलू युवराजचे सिंह (Yuvraj Singh) याचेही  नाव जोडले गेलेय. युवराजने विराट कोहलीला मोलाचा सल्ला दिला आहे. 


विराट कोहलीच्या फॉर्मवर बोलताना युवराज सिंह म्हणाला की,  'ज्या फॉर्ममध्ये विराट आहे, तो स्वत:ही नाखूश असेल. विराट कोहलीला आपण शतकांवर शतकं ठोकताना पाहिलेय. विराट कोहलीने स्वत:साठी एक वेगळा दर्जा निर्माण केलाय. विराट कोहली पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये परतेल. त्याला फ्री होऊन खेळण्याची गरज आहे. विराट कोहली जर फ्री होऊन खेळला तर नक्कीच धावांचा पाऊस पाडेल. आपल्याला पुन्हा एकदा जुना विराट कोहली दिसेल.  विराट कोहलीने अनेकदा स्वत:ला सिद्ध केलेय. त्यामुळे तो लवकरच दणक्यात पुनरागमन करेल. '


आरपी सिंहचा सल्ला -
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंह याने विराट कोहलीला आरामाची गरज असल्याचे सांगितले. आरपी सिंह आरसीबीकडून खेळलाय. आरपी सिंह म्हणाला की, 'विराट कोहलीने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये विराट कोहलीचं नाव आहे. पण गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीची बॅट शांत आहे.' आरसीबीने विराट कोहलीला आराम द्यायला हवा, असेही आरपी सिंह म्हणाला. आरसीबी संघ व्यवस्थापन आणि विराट कोहली फॉर्ममधून परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्यांना यामध्ये यश मिळत नाही. अशात विराट कोहलीला आराम करण्याची गरज आहे. आणखी एक दोन सामन्यात विराट कोहली फ्लॉप झाल्यास आरसीबीने आराम द्यावा, असे आरपी सिंह म्हणाला.


2019 पासून विराटची बॅट शांत -
विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक म्हणून ओळखलं जातं. विराट कोहलीची धावांचू भूक पाहून त्याला रनमशीनही म्हटले जाते. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीसारखा भरवशाचा फलंदाज दुसरा कुणीच नाही. पण मागील काही हंगामापासून विराट कोहलीची बॅट शांत आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून अखेरचं शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी आले होते. बांगलादेशविरोधात झालेल्या डे नाईट कसोटी सामन्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शतक झळकावले होते. त्यानंतर विराट कोहलीला शतक झळकावता आलेलं नाही. आयपीएलमध्ये 2016 चा अपवाद वगळता त्यानंतर प्रत्येक हंगामात विराट कोहलीची बॅट शांतच राहिली आहे.