Yash Dayal Not Spotted In Training : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) आयपीएलच्या सुरुवातीपूर्वी बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे सराव शिबिराला सुरुवात झाली आहे. मात्र, संघाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहलीसह (Virat Kohli) अनेक दिग्गज खेळाडू सरावात व्यस्त असताना वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) मात्र कुठेच दिसत नाही. 18 मार्चपासून सुरू झालेल्या या कॅम्पमध्ये त्याची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करत आहे, कारण फ्रँचायझीने शेअर केलेल्या कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओमध्ये तो दिसलेला नाही.
यश दयाल नेमका कुठे आहे? (Yash Dayal Not Spotted In Training)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आरसीबीच्या टीम बसच्या फोटोमध्येही यश दयाल दिसत नाही. मात्र, त्याची पत्नी श्वेता पुंडीर हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो सराव करताना दिसतो, पण हा सराव बंगळुरू कॅम्पपासून दूर कुठेतरी सुरू असल्याचं स्पष्ट होतं. या प्रकरणी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने फ्रँचायझीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असला तरी अधिकृत स्पष्टीकरण अद्याप मिळालेलं नाही.
यश दयालवर गंभीर आरोप (Yash Dayal IPL 2026 RCB)
उत्तर प्रदेशचा खेळाडू असलेल्या यश दयालवर दोन वेगवेगळ्या प्रकरणांत लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. गाझियाबादमधील एका महिलेने त्याच्यावर लग्नाचे आश्वासन देत सुमारे पाच वर्षे शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला असून त्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय जयपूरमध्ये पॉक्सो कायद्यान्वये अल्पवयीन मुलीशी संबंधित आणखी एक गंभीर प्रकरण नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयने त्याला अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता. या सर्व वादांनंतरही त्याची क्रिकेट कारकीर्द सुरू राहिली आणि आयपीएल 2025 मधील आरसीबीच्या विजयानंतर त्याला 2026 साठीही कायम ठेवण्यात आले.
विशेष म्हणजे, त्याने शेवटचा स्पर्धात्मक सामना जून 2025 मधील आयपीएल फायनलमध्ये खेळला होता. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावरून पूर्णपणे गायब आहे. उत्तर प्रदेशच्या घरेलू संघानेही संपूर्ण हंगामात त्याची निवड केली नाही.
आयपीएलमध्ये खेळणार का?
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यश दयाल आयपीएल 2026 मध्ये आरसीबीसाठी खेळणार का? एका बाजूला रजत पाटीदार, भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्या यांसारखे खेळाडू विजेतेपद टिकवण्यासाठी सज्ज आहेत, तर दुसऱ्या बाजूला संघाचा महत्त्वाचा गोलंदाज अशा प्रकारे गायब असणे व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरत आहे.
हे ही वाचा -
