Sri Lanka Cricket Hold Fitness Test : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 ची सुरुवात 28 मार्चपासून होणार आहे. या हंगामात श्रीलंकेचे अनेक अनुभवी खेळाडूही विविध फ्रँचायझींकडून खेळताना दिसणार आहेत. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेटने (SLC) अद्याप आपल्या खेळाडूंना आयपीएलच्या 19व्या हंगामात खेळण्यासाठी ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) दिलेले नाही.

IPL खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट अनिवार्य

SLC पुढील आठवड्याच्या सुरुवातीला कोलंबो येथे काही खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेणार आहे. या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या खेळाडूंनाच NOC दिले जाणार आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) याच्यासह वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) (लखनऊ सुपर जायंट्स), ईशान मलिंगा (Eshan Malinga) (सनरायझर्स हैदराबाद) आणि नुवान तुषारा (Nuwan Thushara) (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) हे खेळाडू या हंगामात खेळणार आहेत. त्यामुळे या सर्वांची कसून फिटनेस तपासणी केली जाणार आहे.

IPL 2026 मध्ये 7 श्रीलंकन खेळाडू

क्रिकबजच्या माहितीनुसार, अनेक फ्रँचायझी अधिकाऱ्यांनी सांगितले की SLC सोमवारी आणि मंगळवारी फिटनेस टेस्ट घेणार आहे. या चाचणीनंतरच खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत स्पष्टता येईल. दुष्मंथा चमीरा (Dushmantha Chameera) (दिल्ली कॅपिटल्स), पथुम निसांका (Pathum Nissanka) (दिल्ली कॅपिटल्स) आणि कामिंदू मेंडिस (Kamindu Mendis) (सनरायझर्स हैदराबाद) हे इतर श्रीलंकन खेळाडूही या हंगामात सहभागी होणार आहेत. एकूण 7 श्रीलंकन खेळाडू IPL 2026 मध्ये खेळताना दिसतील.

दुखापतीमुळे वर्ल्डकप गमावला

पथिराना, हसरंगा, मलिंगा आणि तुषारा हे अलीकडेच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. हसरंगा 8 फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर झाला होता. पथिरानाने वर्ल्ड कपमध्ये तीन सामने खेळले, पण त्यानंतर त्यालाही माघार घ्यावी लागली. तरीही आयपीएल फ्रँचायझींना विश्वास आहे की SLC अखेरीस या खेळाडूंना खेळण्याची परवानगी देईल.

IPL 2026 शेड्यूल जाहीर

बीसीसीआयने आयपीएल 2026 साठी सध्या 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सर्व 10 संघ प्रत्येकी 4 सामने खेळणार आहेत. स्पर्धेचा पहिला सामना 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:30 वाजता बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व ईशान करणार असून RCB चे नेतृत्व रजत पाटीदारकडे असेल.

हे ही वाचा -

नक्की चाललंय काय? एकामागून एक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडली IPL ची साथ अन् CSK टेन्शनमध्ये... 'तो' मोठा खेळाडूही आता बाहेर