UPW-W vs RCB-W, Match Highlights : महिला आयपीएल स्पर्धेत सलग पाच पराभवानंतर अखेर आरसीबीने विजयाचं खाते उघडले. आज झालेल्या सामन्यात आरसीबीने पाच विकेट्स आणि 12 चेंडू राखून युपीचा पराभव केला. एलिस पेरीच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर आरसीबीने युपीला 135 धावांवर रोखलं. त्यानंतर 18 व्या षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले. महिला आयपीएल स्पर्धेतील आरसीबीचा हा पहिलाच विजय होय. सलग पाच पराभव झाल्यामुळे आरसीबीचा संघाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. पण या विजयासह आरसीबीने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय. 


आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना हिने नाणेफेकीचा कौल जिंकत युपीला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. पहिल्या पाच धावांच्या आत आरसीबीने युपीच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. एलिसा पैरीने अचूक टप्प्यावर मारा केला. अवघ्या 31 धावांत युपीचा अर्धा संघ तंबूत परतला होता. एलिसा हेली, देविका वैदय, टी मॅकग्रथ, सिमरन शेख यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. किरन नवगिरे हिने 22 धावांची छोटेखानी खेळी केली. तर ग्रेस हॅरीस हिने 46 धावांची खेळी केली. ग्रेसच्या 46 धावांच्या मदतीमुळे युपीने 100 धावांचा पल्ला पार केला. 


आरसीबीकडून एलिसा पेरी हिने धारधार गोलंदाजी केली. एलिसा पेरी हिने 4 षटकात 16 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स घेतल्या. तर सोफी डिवाइन हिने 4 षटकात 23 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. आशा शोबाना हिने 4 षटकात 27 धावा खर्च करत दोन जणांना तंबूत धाडले. तर मेगना सुचित आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.






 135 धावांवर युपीला रोखल्यानंतर आरसीबी संघ प्रत्युत्तारासाठी मैदानात उतरला खरा... पण संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार स्मृती मंधाना खातेही न उघडता तंबूत परतली. सोफी डिवायनलाही मोठी खेळी करता आली नाही. अवघ्या 14 धावांत आरसीबीची सलामी जोडी तंबूत परतली होती, त्यातच एलिसा पेरीही बाद झाली. त्यामुळे पुन्हा एकदा पराभवाची नामुष्की ओढावणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. पण हेथर नाईट (24), कनिका आहुजा (46) आणि ऋचा घोष (31) यांनी आरसीबीला विजय मिळवून दिला. युपीकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. त्याशिवाय देविका वैदय, सोफी एस., ग्रेस हॅरीस यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  


आणखी वाचा :


IPL 2023 : पंत ते बुमराह, 'हे' स्टार खेळाडू आयपीएलला मुकणार, पाहा संपूर्ण यादी