Smriti Mandhana in the WPL : महिला आयपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम सुरु आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीला लिलाव प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये भारताची सलामी फलंदाज स्मृती मंधानाला आरसीबीने कोट्यवधी रुपये खर्च करुन संघात घेतलं होतं. स्मृती महिला आयपीएलमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली होती, पण तिला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. सहा सामन्यात आरसीबीची कामगिरी तर हवी तशी झाली नाहीच. पण कर्णधार स्मृती मंधानाची बॅटही शांतच राहिली. स्मृतीला सहा सामन्यात 100 धावाही करता आल्या नाहीत. यामुळे स्मृती मंधानाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
स्मृतीची कामगिरी कशी राहिली ?
कोट्यवधी रुपयांना खरेदी केलेल्या स्मृतीला आरसीबीने कर्णधारपद दिलं. पण स्मृतीला फलंदाजी आणि नेतृत्वातही आपली चमक दाखवता आली नाही. आरसीबीला एकापाठोपाठ एक पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी स्मृतीची कामगिरीही खालावलेली दिसली. सहा सामन्यात स्मृतीला 100 धावाही करता आल्या नाहीत. स्मृती मंधानाने सहा सामन्यात फक्त 14.6 च्या सरासरीने आणि 112 च्या स्ट्राईक रेटने फक्त 88 धावा केल्या आहेत. यादरम्यान स्मृतीची सर्वोच्च धावसंख्या 35 इतकी राहिली. सहा डावात तीन वेळा स्मृतीला दुहेरी संख्याही गाठता आली नाही.
कुणाविरोधात किती धावा झळकावल्या ?
5 मार्च, दिल्ली कॅपिटल्स - 35 (23).
6 मार्च, मुंबई इंडियन्स - 23 (17).
8 मार्च, गुजरात जायंट्स- 18 (14).
10 मार्च, युपी- 4 (6).
13 मार्च, दिल्ली कॅपिटल्स - 8 (15).
15 मार्च, युपी - 0 (3).
एकूण धावसंख्या 88
आरसीबीने कोट्यवधी केले खर्च -
वुमन्स प्रिमियर लीग या स्पर्धेपूर्वी सर्व खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. या लिलावात आरसीबीने स्मृती मंधानावर कोट्यवधी रुपये खर्च केले होते. आरसीबीने स्मृती मंधानाला 3 कोटी 40 लाख रुपये इतकी किंमत मोजून संघात घेतले होते. या स्मृती मंधाना लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली होती. महिला आयपीएल स्पर्धा अर्ध्यावर येऊन पोहचली आहे, पण स्मृती मंधानाला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. स्मृतीची कामगिरी तर खराब आहेच, पण आरसीबीला संघालाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. सहा सामन्यात आरसीबीला फक्त एक विजय मिळवता आलेला आहे. कागदावर ताकदवान दिसणारा आरसीबीचा संघ मैदानावर मात्र फ्लॉप होताना दिसत आहे.
ही बातमी वाचायला विसरु नका
WPL 2023 : दुष्टचक्र संपलं! सलग 5 पराभवानंतर अखेर आरसीबीचा विजय