Womens Premier League 2023 : वुमन्स आयपीएलमधील मुंबई आणि दिल्लीचा सामना एकतर्फी झाला. आज झालेल्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा नऊ विकेट्सने पराभव केला. या विजयासह दिल्ली कॅपिटल्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. तर मुंबई इंडियन्स संघाचा हा सलग दुसरा पराभव होय. त्यामुळे अव्वल स्थानावर असलेल्या मुंबईच्या संघाची घसरण झाली. 


वुमन्स प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेतील 18 सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा नऊ विकेट्सने पराभव केला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईने दिलेले 110 धावांचे आव्हान दिल्लीने नऊ विकेट्स राखत पूर्ण केले. दिल्लीची कर्णधार मेह लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी विस्फोटक सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 56 धावांची शानदार भागिदारी केली. 
 
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. मुंबईच्या संघाला निर्धारित 20 षटकात आठ विकेट्सच्या मोबद्लायत फक्त 109 धावा करता आल्या. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने दणक्यात सुरुवात केली. पहिल्या चेंडूपासून धावांचा पाऊस पाडला. शेफाली वर्माने अवघ्या 15 चेंडूत 33 धावांचा पाऊस पाडला. दिल्लीने पॉवरप्लेच्या सहा षटकात 67 धावांचा पाऊस पाडला होता. शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार मेग लॅनिंग हिने एलिस केप्सीच्या मदतीने विजय मिळवून दिला. मेग लॅनिंग आणि एलिस केप्सी यांनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 25 चेंडूत 51 धावांची भागिदारी केली. शेफाली वर्मा, मेग लॅनिंग आणि एलिस केप्सी यांच्या विस्फोटक फलंदाजीमुळे दिल्लीने 110 धावांचे लक्ष 11 षटकात पूर्ण केले.  मेग लॅनिंग हिने 22 चेंडूत 32 धावांची खेळी केली. तर केप्सीने 17 चेंडूत 38 धावांचा पाऊस पाडला. 


दिल्लीचा भेदक मारा, मुंबईच्या फलंदाजांनी टाकली नांगी - 


दिल्ली कॅपिटल्स महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला. 21 धावांच्या आत मुंबईच्या चार आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. दिल्लीच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. ठरावीक अंतारावर विकेट घेतल्या. 


मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्रकर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघींनी अनुक्रमे 23 आणि 26 धावांची खेळी केली. यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. 20 षटकात 109 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून मरिजाने केप, शिखा पांडे आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या.