Simon Doull on Digvesh Rathi Celebration : लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) युवा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी सध्या आयपीएल 2025 मधील त्याच्या शानदार कामगिरीमुळे तसेच त्याच्या अनोख्या सेलिब्रेशन शैलीमुळे चर्चेत आहे. या सेलिब्रेशनमुळे त्याला मोठा दंड भरावा लागत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (BCCI) राठीवर दोनदा दंड ठोठावला आहे, ज्याची एकूण रक्कम 5,62,500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या निर्णयावर क्रिकेट विश्वात चर्चा सुरू झाली आहे. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि जिओहॉटस्टारचे आयपीएल तज्ज्ञ सायमन डॉल यांनी बीसीसीआयच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

डॉलने बीसीसीआयच्या निर्णयावर घेतला आक्षेप अन्....

सायमन डॉल यांनी पंचांमधील भेदभावाचा प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले, 'संघाला हा दंड भरावाच लागेल, पण मला ते अजिहात आवडले नाही. त्याचे सेलिब्रेशन भारी होते, मला वाटत नाही की त्याने काही चूक केली असेल. मी भारतीय वरिष्ठ खेळाडूंना यापेक्षाही आक्रमकपणे सेलीब्रेशन करताना पाहिले आहे, परंतु त्यांना दंड ठोठावण्यात आला नाही. तो फक्त त्याच्या वहीत काहीतरी लिहित होता. सायमन डॉल बऱ्याच काळापासून आयपीएलमध्ये समालोचन करत आहे आणि येथे त्याने खूप पैसे कमवले आहेत. आता त्यांनी या प्रकरणावर बीसीसीआयविरुद्ध आपले मत व्यक्त केले आहे.

दिग्वेश राठी अनोख्या सेलीब्रेशन चर्चेत

पंजाब किंग्जचा फलंदाज प्रियांश आर्यला आऊट केल्यानंतर राठीने पहिल्यांदाच हे सेलिब्रेशन केले होते. नंतर असे उघड झाले की राठी आणि आर्या चांगले मित्र आहेत आणि मित्रांच्या मजामस्तीचा एक भाग होता. पण बीसीसीआयला ते खटकले आणि राठीच्या मॅच फीच्या 25% दंड आणि एक डिमेरिट पॉइंट ठोठावला. 

नंतर, मुंबई इंडियन्सच्या नमन धीरला आऊट केल्यानंतर राठीने तेच 'नोटबुक सेलिब्रेशन' पुन्हा केले, ज्यामुळे त्याला त्याच्या मॅच फीच्या 50% दंड ठोठावण्यात आला आणि 2 डिमेरिट पॉइंट मिळाले. अशाप्रकारे, हा त्याचा दुसरा लेव्हल 1 उल्लंघन ठरला.

केकेआरविरुद्ध सेलिब्रेशनची शैली बदलली 

दंडातून शिकत राठीने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात त्याची सेलिब्रेशन शैली बदलली. यावेळी, कोणत्याही खेळाडूकडे बोट दाखवण्याऐवजी त्याने मैदानावरच त्याचे स्वाक्षरी केली, जेणेकरून तो नियमांचे पालन करताना त्याची ओळख टिकवून ठेवू शकेल.

दिग्वेश राठीच्या या प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या भावना आणि त्यांची वेगळी ओळख दडपली जात आहे का? विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारखे स्टार खेळाडू आक्रमक सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात, परंतु एका तरुण खेळाडूला दंड ठोठावणे योग्य आहे का?