Ishant Sharma IPL 2025 : आयपीएल 2025 च्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. गुजरातने चालू हंगामातील हा सलग तिसरा सामना जिंकला. या सामन्यात मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल यांनी संघासाठी चांगली कामगिरी केली. तर इशांत शर्मा खूप महागडा ठरला आणि त्याने खुप धावा दिल्या. आता विजयानंतर, बीसीसीआयने एका कारणास्तव इशांतवर कारवाई केली आहे आणि दंड ठोठावला आहे.

Continues below advertisement






इशांत शर्मावर बीसीसीआयची कडक कारवाई 


या सामन्यादरम्यान, इशांत शर्माला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. पण, आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये या घटनेचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यात फक्त एवढेच म्हटले होते की इशांतने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याला लेव्हल 1 चा दोषी आढळला आहे. इशांतने त्याची चूक मान्य केल्यामुळे, यावर पुढील सुनावणी होणार नाही. शिक्षा म्हणून, त्याला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. 


सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्या 53 धावा 


सनरायझर्स हैदराबादविरुद्ध इशांत शर्माने खूपच खराब कामगिरी केली. त्याने त्याच्या 4 षटकांत 53 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. कर्णधार शुभमन गिलने त्याचा प्रभावशाली खेळाडू म्हणून वापर केला आणि त्याच्या जागी शेरफेन रदरफोर्डला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले. आयपीएल 2025 मध्ये इशांतची कामगिरीही काही खास राहिली नाही. चालू हंगामात त्याने आतापर्यंत तीन सामन्यांत फक्त एकच विकेट घेतली आहे.


इशांत शर्मा 2008 पासून आयपीएलमध्ये सहभागी होत आहे. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. त्याने 113 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 93 विकेट्स घेतल्या आहेत.


गुजरात टायटन्स संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर  


चालू आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा हा सलग तिसरा विजय आहे. संघाने आतापर्यंत एकूण चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. त्याचा 6 गुणांसह नेट रन रेट अधिक 1.031 आहे. तो पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.