GT Vs SRH: आयपीएल 2022 च्या 40 व्या सामन्यात गुजरातच्या संघानं पाच विकेट्सनं विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि एडन मार्कराम यांनी अर्धशतक झळकवत अप्रतिम कामगिरी केली. त्याचवेळी शेवटच्या क्षणी 30 वर्षीय शशांक सिंहनं (Shashank Singh) तुफानी फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. शेवटच्या षटकात शशांकनं लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर सलग 3 चेंडूत 3 षटकार मारले.
शशांकनं संधीचं सोनं केलं
शशांक 30 वर्षांचा असला तरी त्याला प्रथमच आयपीएलमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. शशांक हा अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये हैदराबादच्या संघानं त्याला 20 लाखांना विकत घेतलं. शशांकनं 9 एप्रिल रोजी चेन्नईविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्यानं 4 सामने खेळले. मात्र, त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. सहाव्या सामन्यात शशांकला फलंदाजीची संधी मिळाली आणि संधीचं त्यानं सोनं केलं.
शशांकचा संघर्षमय प्रवास
शशांकनं 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सनं त्याला संघात सामील केलं. परंतु, दिल्लीच्या संघानं त्याला संधी न देता रिलीज केलं. त्यानंतर 2019 मध्ये राजस्थानच्या संघानं त्याला 30 लाखात विकत घेतलं. मात्र, राजस्थानकडूनही त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, 2020 मध्ये राजस्थाननं त्याला संघात कायम ठेवलं. परंतु, तेव्हाही त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. आता 2022 मध्ये हैदराबादला त्याची योग्यता समजली. हैदराबादनं त्याला पदार्पणाची संधी दिली. म्हणजेच तीन वर्षांनी शशांकला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली.
शशांकची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
शशांकनं आतापर्यंत खेळलेल्या 37 टी-20 सामन्यांमध्ये 142.28 च्या स्ट्राइक रेटनं 424 धावा केल्या आहेत. त्याच्या षटकारांची तुलना महेंद्रसिंह धोनीशीही केली जात आहे. त्यानं टी-20 मध्ये आतापर्यंत 22 षटकार मारले आहेत. यासोबतच त्यानं टी-20 मध्ये 10 विकेट्सही घेतल्या आहेत. शशांकनं प्रथम श्रेणीमध्ये आतापर्यंत 9 सामन्यांत 436 धावा केल्या आहेत आणि 4 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 23 लिस्ट ए सामन्यात 2 अर्धशतकांच्या मदतीनं 536 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-