Virender Sehwag on Ishan Kishan : आयपीएल 2025 च्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या 41 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज इशान किशन विचित्र पद्धतीने आऊट झाला. त्याच्या विकेटवरून आता वाद पेटला आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इशान किशन ज्या पद्धतीने पॅव्हेलियनमध्ये परतला, ते सेहवागला आवडले नाही. त्याने एसआरएचच्या फलंदाजावर टीका केली.   

सनरायझर्स हैदराबाद (SRH) फलंदाजी करत असताना डावाच्या तिसऱ्या षटकात इशान किशन पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता मैदानाबाहेर गेला. मुंबई इंडियन्स (MI) चा वेगवान गोलंदाज दीपक चहरने इशान किशनला लेग साईडवर एक चेंडू टाकला, जो बॅटच्या अगदी जवळून गेला. दीपक चहर आणि मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक इशान किशनविरुद्ध झेलबाद झाल्याबद्दल अपीलही करत नव्हता, पण पंचांनी अर्धी बोट वर केली. पंचांची कृती पाहून दीपक चहरने पुन्हा अपील केले आणि इशान किशन निघून गेला.

सेहवागने इशान किशनला फटकारले....

इशान किशनकडे डीआरएस घेण्याचा पर्याय होता, पण त्याने तो घेतला नाही. नंतर कळले की तो एक वाइड बॉल होता. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे की, इशानने तिथे त्याच्या डोक्याचा वापर करायला हवा होता आणि तो आऊट नसतानाही क्रीजवरून निघून गेला. वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, त्याने वाट पाहायला हवी होती आणि मैदानावरील पंचांना अंतिम निर्णय घेऊ द्यायला हवा होता, कारण त्यांनाही त्यांचे काम करण्यासाठी पैसे दिले जातात.

'मला हा प्रामाणिकपणा समजला नाही...'

वीरेंद्र सेहवागने इशान किशनवर टीका केली आणि म्हटले, 'त्यांना (अंपायरांना) त्यांचे काम करू द्या.' मला हा प्रामाणिकपणा समजला नाही. जर चेंडू बॅटला लागला असता तर ते समजण्यासारखे होते, कारण असे करणे खेळाच्या भावनेनुसार झाले असते. पण चेंडू लागला नाही आणि पंचांना खात्री नव्हती, तरी तो अचानक मैदान सोडून गेलास.

रिप्लेमध्ये असे दिसून आले की इशान किशनच्या शरीराच्या कोणत्याही भागाला चेंडू लागला नाही, बॅट तर सोडाच. पण, इशान किशनने पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता त्याची विकेट फेकून दिली.