Virat Kohli, RCB IPL 2024 : रनमशीन विराट कोहली आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी सज्ज झालाय. विराट कोहलीच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात एक आगळावेगळा विक्रम आहे. आयपीएलचे 16 हंगाम एकाच संघाकडून खेळण्याचा अनोखा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. धोनी, रोहित, गंभीर, कार्तिक कोणत्याही खेळाडूला हा विक्रम करता आला नाही. भविष्यात असा विक्रम होण्याची शक्यताही धुसूर दिसतेय. विराट कोहली 2008 पासून आरसीबीच्या संघाचा सदस्य आहे. त्याने आरसीबीसोबत नुकताच आपला 16 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. आरसीबीने सोशल मीडियावर विराट कोहलीसोबतच्या खास प्रवासासाठी व्हिडीओ आणि फोटोही पोस्ट केला होता. पण मागील 16 वर्षांमध्ये विराट कोहलीचा पगार किती झाला? विराट कोहलीला आरसीबीने पहिल्या वर्षी किती रुपयांमध्ये खरेदी केले? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात... 


2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली. त्या वर्षी झालेल्या लिलावात आरसीबीने युवा विराट कोहलीवर डाव खेळला. अंडर 19 विश्वचषक विजेता कर्णधार म्हणून 2008 मध्ये विराट कोहली प्रसिद्धीझोतात आला होता. आरसीबीने विराट कोहलीवर त्यावेळी खेळलेला डाव मास्टरस्ट्रोक झाला. कारण, आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने अनेक विक्रमांचे इमले बांधले. विराट कोहलीच्या नावावर सात शतकांचा विक्रम आहे. आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणूनही विराट कोहलीचेच नाव आहे. 2008 ते 2004 या 17 वर्षांमध्ये विराट कोहलीला प्रत्येक वर्षी आरसीबीकडून किती पगार मिळत होता?


पहिला चेक -


2008 मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात आरसीबीने विराट कोहलीला 12 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. विराट कोहलीला अंडर 19 च्या ड्राफ्टमधून निवडण्यात आले होते. त्यावेळी विराट कोहलीची बेस प्राईज 10 लाख रुपये इतकी होती. 2008, 2009, 2010 या तीन हंगामासाठी आरसीबीने विराट कोहलीला प्रत्येकवर्षी 10 लाख रुपये दिले. पण त्यानंतर विराट कोहलीच्या पगारात मोठी वाढ झाली.  


लखपती विराट झाला करोडपती -  


2011 च्या आयपीएल हंगामात विराट कोहलीच्या पगारात मोठा बदल झाला. विराट कोहलीसोबत आरसीबीने तब्बल 8.28 कोटी रुपयांचा करार केला. त्यानंतर पुढील तीन वर्षे 2011, 2012 आणि 2013 या तीन हंगामात प्रत्येकवर्षी आरसीबीकडून विराट कोहलीला  8.28 कोटींचा पगार दिला. 2013 पर्यंत विराट कोहली कर्णधार नव्हता, पण त्याची फलंदाजी सर्वांनाच प्रभावीत करत होते. त्याने अनेक विक्रम केले होते.


कर्णधार झाला अन् पगारही वाढला - 


2013 च्या हंगामासाठी आरसीबीने विराट कोहलीला कर्णधार म्हणून नियुक्त केले. त्यवेळी त्याचा पगारही वाढला. विराट कोहलीला प्रत्येक हंगामासाठी 12.5 कोटी रुपयांचा पगार झाला.   2014, 2015, 2016 आणि 2017 या प्रत्येक आयपीएल हंगामासाठी विराट कोहलीला  12.5 कोटी रुपये पगार मिळाला. 


सर्वाधिक पगार - 


2018 आयपीएल हंगामात विराट कोहलीच पगार सर्वाधिक झाला. विराट कोहलीसाठी आरसीबीने 17 कोटी रुपये मोजले. विराट कोहली त्यावेळी जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज होता. त्याशिवाय त्याच्याकडे टीम इंडियाची धुराही आली होती. 2018, 2019, 2020 आणि 2021 या प्रत्येक आयपीएल हंगामासाठी आरसीबीने विराट कोहलीला 17 कोटींचा पगार दिला. 


पगारात घट - 


आयपीएलच्या 2022 हंगामात विराट कोहलीच्या पगारात घट झाली, आरसीबीने लिलावात बजेट वाढवण्यासाठी विराट कोहलीचा पगार कमी केल्याचं सांगितलं. 2022 पासून विराट कोहलीला आरसीबी 15 कोटींचा पगार देत आहे. यंदाही विराट कोहलीला आरसीबीकडून 15 कोटी रुपयांचा पगार मिळणार आहे.