राजस्थान रायल्स (RR) विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav suryavanshi) धुव्वादार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. अवघ्या 35 चेंडूत आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासातील दुसरं सर्वाधिक जलद शतक वैभवने झळवकावून अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधले. बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातील वैभवच्या वडिलांची परिस्थिती बेताचीच. कधीकाळी मुंबईत पडेल ते काम करुन मैदानाबाहेरुन क्रिकेटची प्रॅक्टस पाहणाऱ्यांना पाहून लेकाला क्रिकेटर बनविण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. अखेर आयपीएल (IPL) सामन्यातील तडाखेबंद एंट्रीने वडिलांच्या कष्ट आणि मेहनतीला सत्यात उतरवरत वैभवने वडिलांची व स्वत:ची स्वप्नपूर्ती केली.
मी आज जो काही आहे, तो माझ्या आई-वडिलांमुळेच आहे. मला प्रॅक्टीसला जाण्यासाठी आई मध्यरात्री 2 वाजता उठून जेवण बनवायची. माझी आई रात्री 11 वाजत झोपून केवळ 3 तास झोपायची, असे वैभवने सांगितले. वडिलांनी माझ्यासाठी काम सोडून दिलं, वडिलांच्या जागी ते काम मोठ्या भावाने करायला सुरुवात केली. मोठ्या कष्टाने आमचं घर चालत होतं. मी करेल, मी क्रिकेट खेळेल असा विश्वास मला सातत्याने माझ्या वडिलांनीच दिला. त्यामुळे, मी आज जो आहे तो आई-वडिलांमुळेच आहे, असे वैभवने म्हटले. वैभव ज्या गावी राहायचा तिथून त्याला क्रिकेटच्या प्रॅक्टीससाठी 100 किमी दूरवर असलेल्या अॅकॅडमीत जावे लागत. त्यासाठीचा, संघर्ष वैभवने आपल्या वादळी, शतकी खेळीनंतर सांगितलाय.
वैभवच्या शतकी खेळीने कुटुंबीयांना आनंद
वैभवच्या तडाखेबंद शतकी खेळीमुळे वैभवच्या आई-वडिलांनी अत्यानंद व्यक्त केला. आमच्या कुटुंबीयांसह गल्ली, तालुका, जिल्हा, बिहार आणि देशभर आनंद व्यक्त होत आहे. त्याबद्दल आम्ही राजस्थान रॉयल्स संघाच्या संपूर्ण मॅनेजमेंटचे आभार मानतो. गेल्या 3-4 महिन्यांपासून राजस्थान रॉयल्सने वैभवला आपल्यासोबत ठेऊन चांगलं ट्रेन केलंय. त्यामुळे, सर्वांचे आभार मानतो, असे वैभवचे वडिल संजीय सूर्यवंशी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे.
11 षटकारांसह 35 चेंडूत शतक
आयपीएल 2025 चा 47 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला. ज्यामध्ये आरआरने 8 विकेट्सने विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक झळकावले. त्यामध्ये 11 षटकार आणि 7 चौकार लगावले. फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आलेल्या वैभवने 11 व्या षटकातच आपले शतक पूर्ण केले.
सर्वात जलद शतक झळकवणार पहिला भारतीय
वैभव सर्वात जलद शतक करणारा पहिला भारतीय फलंदाजही ठरला. एवढेच नाही तर तो आयपीएल आणि टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाजही बनला आहे. त्याच वेळी, वैभवने षटकार मारण्यातही सर्वांना मागे टाकले. त्याने त्याच्या डावात एकूण 11 षटकार मारले. त्यानंतर सूर्यवंशी टी-20 डावात सर्वाधिक षटकार मारणारा पहिला भारतीय ठरला. या प्रकरणात त्याने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरलाही मागे टाकले.