IPL 2022 Marathi News : स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) स्पर्धेतून सर्वात आधी बाहेर पडला आहे. त्यांनी 12 पैकी केवळ 3 सामने जिंकले असून 9 सामने गमावले आहेत. पण असे असतानाही संघातील काही खेळाडूंनी आपल्या खेळाची छाप क्रिकेट रसिकांवर सोडली आहे. यामध्ये 19 वर्षीय तिलक वर्माचे नाव आघाडीवर आहे. यंदाच्या हंगामात तिलक वर्माने मुंबईकडून सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. नुकत्याच झालेल्या चेन्नईविरोधातील सामन्यात तिलक वर्माने (Tilak Varma)  34 धावांची खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला. या खेळीनंतर तिलक वर्माने मोठा विक्रम नावावर केला. तिलक वर्माने पाच वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढलाय. 


तिलक वर्माने आतापर्यंत 12 सामन्यात 368 धावांचा पाऊस पाडलाय. तिलक वर्मा आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा काढणारा टीन एजर खेळाडू बनलाय. तिलक वर्माने पाच वर्षापूर्वीचा ऋषभ पंतचा (Rishabh Pant) विक्रम मोडला आहे. 2017 मध्ये दिल्लीकडून खेळताना पंतने 14 सामन्यात 366 धावा केल्या होत्या.  पृथ्वी शॉने  2019 साली 16 सामन्यांत 353 धावा चोपल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंचा विक्रम तिलक वर्माने मोडला आहे. 


मुंबईने तिलक वर्माला एक कोटी 70 लाख रुपयांत विकत घेतले होते. यंदाच्या हंगमात मुंबईकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये तिलक वर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. तिलक वर्माने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनाही मागे टाकलेय.  


तिलक वर्माची यंदाची कामगिरी - 
मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये चमकलेला एक युवा तारा आहे. तिलकने हंगामातील 12 सामन्यात 40.89 च्या सरासरीने आणि 132.85 च्या स्ट्राइक रेटने 368 रन केले आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही 7 व्या स्थानावर आहे. तिलकने आयपीएल 2022 मध्ये दोन अर्धशतकं झळकावली असून 61 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.


हे देखील वाचा-