IPL 2022 Marathi News : आयपीएलचा 15 वा हंगाम अखेरच्या टप्प्याकडे झुकलाय. आतापर्यंत झालेल्या 59 सामन्यानंतर मुंबई आणि चेन्नई यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने प्लेऑफमध्ये स्थान पटकावलेय. तर उर्वरित तीन जागांसाठी सहा संघामध्ये लढत होईल. यंदाचा हंगामात चेन्नईने निराशाजनक कामगिरी केली आहे. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदाच चेन्नई प्लेऑफमध्ये पोहचू शकली नाही. 2020 आणि 2022 या दोन हंगामात चेन्नईचे साखळी फेरीत आव्हान संपलेय.  12 सामन्यात चेन्नईने फक्त चार  विजय मिळवलेत.. पण या सामन्यात चेन्नईला नवीन खेळाडू मिळाले आहेत. पुढील बरीच वर्षे हे खेळाडू चेन्नकडून खेळताना दिसू शकतात.. यामध्ये वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी, फिरकीपटू महेश तीक्षणा आणि सलामी फलंदा डेवोन कॉन्वे यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी सर्वांनाच प्रभावित केलेय. 


मुकेश चौधरी - 
दीपक चाहरच्या अनुपस्थितीत मुकेश चौधरीने वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली. चौधरीने आपल्या स्विंगने अनेकांना चकवा दिलाय. 11 सामन्यात मुकेश चौधरीने 16 विकेट घेतल्यात. मुकेश चौधरीने  यांदाच्या हंगामात 38.3 षटके गोलंदाजी केली आहे. यामध्ये 355 धावा खर्च केल्यात.  


महेश तीक्षणा - 
श्रीलंकेचा युवा फिरकीपटू  महेश तीक्षणाने यंदा चेन्नईसाठी भेदक मारा केला. त्याने 9 सामन्यात 7.45 च्या इकॉनमीने आणि 21.75 च्या सरासरीने 12 विकेट घेतल्यात. 35 षटकांमध्ये तीक्षणाने  261 धावा दिल्यात. 


डेवोन कॉन्वे -
चेन्नई सुपर किंग्सने सलामी फलंदाज डेवोन कॉन्वेला पहिल्या काही सामन्यात प्लेईंग 11 मध्ये संधी दिली नव्हती.. ज्यावेळी संधी मिळाली तेव्हा कॉन्वेने धावांचा पाऊस पाडला.  कॉन्वेने पाच सामन्यात 154 च्या स्ट्रइक रेटने 231 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.  


चार वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या चेन्नईचे साखळी फेरीतच आव्हान संपलेय. चेन्नईला 12 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आलेत. चेन्नईचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीची अनेक कारणे असू शकतात...त्यापैकीच महत्वाचं एक कारण... तीन स्टार खेळाडूंचं निराशाजनक प्रदर्शन होय... रवींद्र जाडेजा, अंबाती रायडू आणि ब्राव्हो यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.