IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या हंगामाच्या सुरुवातीपासून अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. ज्यात भारताच्या काही अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश आहे. दरम्यान, आयपीएलची स्पर्धेमुळं अनेक खेळाडूंना आपली ओळख निर्माण करता आली आहे. एवढंच नव्हेतर, आयपीएलमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंचं भारतीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातही भारताच्या काही अनकॅप्ड खेळाडूं आपली छाप सोडताना प्रयत्न करताना दिसत आहेत. 


सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि ऋषभ पंत यांसारख्या खेळाडूंनी या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून भारतीय संघात जागा मिळवली. आयपीएलच्या यंदच्या हंगामात अनेक युवा खेळाडू आहेत, जे सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत. या खेळाडूंमध्ये 35 वर्षीय शेल्डन जॅक्सनसह दिल्ली कॅपिटल्सच्या ललित यादवचंही नाव आहे.


ललित यादव 
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्लीच्या संघानं ललित यादववर बोली लावली. आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई विरुद्ध सामन्यात संघ अडचणीत असताना त्यानं मैदानात एन्ट्री केली. या सामन्यात त्यानं 38 चेंडूत 48 धावांची खेळी केली होती. ज्यात चार चौके आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर दिल्लीच्या संघाला मुंबईवर मात करता आली होती. 


तिलक वर्मा
मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मानं दिल्लीविरुद्ध 22 धावांची खेळी केली होती. या खेळाडूने 15 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने आपली फलंदाजी क्षमता दाखवून दिली. टिळक वर्माचे उत्कृष्ट टायमिंग पाहून हर्षा भोगले आणि इरफान पठाण यांनीही त्याचं कौतुक केलं होतं.


आयुष बदोनी
लखनौ सुपर जायंट्सचा फलंदाज आयुष बडोनी गेल्या सामन्यात चर्चेचा विषय ठरला होता. केएल राहुल, क्विंटन डी कॉक, इव्हान लुईस आणि मनीष पांडेसारखे मोठे खेळाडू बाद केल्यानंतर आयुषनं आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं 41 चेंडूत अर्धशतक झळकावलं. यादरम्यान आयुषच्या 54 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे संघाची धावसंख्या 150 च्या पुढे नेण्यात यश आले.


अभिनव मनोहर
गुजरातच्या अभिनव मनोहरने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध फिनिशरची भूमिका बजावली. या खेळाडूची बॅट फ्लो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. शानदार फटकेबाजी करताना अभिनवनं सात चेंडूत तीन चौकारांच्या मदतीनं 15 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. आयपीएलमधील गुजरातच्या आगामी सामन्यांमध्येही अभिनव मनोहरकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.


शेल्डन जॅक्सन
कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टिरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सनने आपल्या विकेटकीपिंगने सर्वांना प्रभावित केलं. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने स्वतः या खेळाडूचे कौतुक केलं होतं. जॅक्सन विकेटच्या मागे खूप वेगवान आहे परंतु, फलंदाजी करताना त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. शेल्डनला टीम इंडियात स्थान मिळवायचे असेल तर त्याची शर्यत ऋषभ पंत आणि इशान किशनसारख्या युवा तुफानी फलंदाजांशी आहे.त्यामुळे त्याला त्याच्या फलंदाजीवर काम करावं लागेल. या खेळाडूची प्रथम श्रेणीत सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. मात्र, त्याला अद्याप भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha