SRH vs DC: आयपीएल 2021 चा 20 वा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आज सायंकाळी साडेसात वाजल्यापासून सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. पॉइंट टेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर असलेला दिल्ली कॅपिटल संघ पंजाब आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध सलग दोन सामने जिंकून या सामन्यात खेळत आहे तर सनरायझर्स हैदराबादने शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून पहिला विजय नोंदविला आहे.


या सामन्यात दिल्लीचे पारडं जड वाटत आहे. सलामीवीर शिखर धवनच्या नावावर आतापर्यंत झालेल्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथसुद्धा मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात फॉर्मात दिसला. तसेच कागिसो रबाडा आणि रविचंद्रन अश्विनच्या उपस्थितीत दिल्लीची गोलंदाजीही मजबूत स्थितीत आहे. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज आवेश खानदेखील यावर्षी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. याशिवाय अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्रा देखील संघाचा मुख्य खेळाडू आहे, जो मुंबई इंडियन्स विरोधात मॅन ऑफ द मॅच राहिला आहे.


सनरायझर्स हैदराबादची या स्पर्धेत आतापर्यंतची कामगिरी निराशजनक राहिली आहे. तीन पराभवानंतर मागचा सामना त्यांनी जिंकला आहे. आता केन विल्यमसनचे पुनरागमन झाले आहे. फिरकीसाठी अनुकूल असलेल्या चेन्नईच्या विकेटवर आणि मिश्रा आणि अश्विनसारख्या गोलंदाजांविरोधात केनला फलंदाज म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजवायची आहे. जर हैदराबादला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर त्यांच्या प्रत्येक फलंदाजाला शेवटपर्यंत खेळावे लागणार आहे. हैदराबादची ताकद म्हणजे त्यांचा फिरकी विभाग आहे.


पिच रिपोर्ट 
चेन्नईची एमए चिदंबरमची खेळपट्टी यंदा मोसमात दुसर्‍या डावात खूपच संथ होत आहे. पहिल्या डावातही इथं मोठी धावसंख्या उभारणे कठीण आहे. या सामन्यातही फिरकी गोलंदाजांना बरीच मदत मिळणार आहे. तसेच नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.


सामन्याचा अंदाज
आमचा सामन्याचा अंदाज सांगतो, की या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचं पारडं जड आहे. सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकण्याची शक्यता जास्त आहे.


सनरायझर्स हैदराबादचे संभाव्य अकरा खेळाडू : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, विराटसिंग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि सिद्धार्थ कौल.


दिल्ली कॅपिटलसाठी संभाव्य अकरा खेळाडू : पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिमरन हेटमीयर, मार्कस स्टोनिस, ललित यादव, आर अश्विन, कॅगिसो रबाडा, अमित मिश्रा आणि अवेश खान.