WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघातील काही खेळाडूंची नावे पहिल्यापासूनच निश्चित होती. तर अजिंक्य रहाणे याने टीम इंडियात पुनरागमन केलेय. WTC ची फायनल सात ते ११ जून यादरम्यान इंग्लंडमधील ओव्हल मैदानात रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यात कसोटी विजेतेपदासाठी सामना रंगणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी सुनील गावस्कर यांनी त्यांची प्लेईंग ११ निवडली आहे. 


भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या ११ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये तीन तीन वेगवान गोलंदाजांना स्थान दिलेय. तर दोन फिरकी गोलंदाजांचा त्यांनी समावेश केला आहे. गावस्कर यांनी निवडलेल्या संघामध्ये पाच गोलंदाज आणि सहा फलंदाजांना स्थान दिलेय. सुनील गावस्कर यांनी विकेटकीपर म्हणून केएल राहुल याची निवड केली आहे. तर अजिंक्य रहाणे याला मध्यक्रममध्ये निवडले आहे. 


रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना सलामी फलंदाज म्हणून गावस्करांनी निवडलेय. तर चेतेश्वर पुजाराला तिसऱ्या तर कोहलीला चौथ्या क्रमांकावर ठेवले. अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तर राहुल विकेटकीपर असेल.. तो सहाव्या स्थानावर फलंदाजी करेल.  रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन या दोन अनुभवी फिरकीपटूंना गावस्करांनी निवडलेय.  जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांची त्यांनी निवड केली.


गावस्करांनी निवडलेले भारताचे ११ शिलेदार कोण?
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.






टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, मग आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


टीम इंडिया 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट


टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.