SRH vs RR IPL 2024 : भुवनेश्वर कुमारनं राजस्थानच्या जबड्यातून सामना हिसकावला. होय, अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात हैदराबादनं फक्त एका धावेनं विजय नोंदवला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती, त्यावेळी भुवनेश्वर कुमारनं अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. हा चेंडू पॉवेलला खेळता आला नाही. चेंडू थेट पॅडवर आदळला. पंचांनी त्याला बाद दिले. सामना हैदराबादनं फक्त एका धावेनं जिंकला. हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 201 धावांचा डोंगर उभराला होता, प्रत्युत्तरदाखल राजस्थानकडूनही कडवी टक्कर देण्यात आली. पण भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानचा पराभव झाला. राजस्थानविरोधात यंदाच्या हंगामात धावांचा यशस्वी बचाव करणारा हैदराबाद पहिलाच संघ ठरलाय. 


अखेरच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती. पॅट कमिन्सने चेंडू अनुभवी भुवनेश्वर कुमार याच्याकडे सोपवला. मैदानावर आर. अश्विन आणि रोवमन पॉवेल फलंदाज होते. पॉवेलचा जम बसला होता, पण भुवनेश्वर कुमारनं आपला अनुभव पणाला लावून धावांचा बचाव केला.  भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या चेंडूवर अश्विन यानं एक धाव घेत स्ट्राईक पॉवेल याला दिली. त्यानंतर पॉवेल यानं आक्रमक रुप घेतलं. त्यानं दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यानंतर खणखणीत चौकार ठोकला. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूवर दोन दोन धावा घेतल्या. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी एका चेंडूवर दोन धावांची गरज होती. त्यावेळी भुवनेश्वर कुमारने अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. पॉवेल याच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळला, पंचांनी बाद दिले, अन् राजस्थानचा अवघ्या एका धावेनं पराभव झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 






सामना कुठे फिरला ? 


अखेरच्या 20 चेंडूमध्ये हैदराबादने सामना फिरवला. नटराजन, पॅट कमिन्स आणि भुवनेश्वर कुमार यांनी भेदक मारा केला. राजस्थानला 20 चेंडूमध्ये 27 धावांची गरज होती. त्यावेळी पॅट कमिन्स, नटराजन यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत धावा रोखल्या. त्याशिवाय तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पॅट कमिन्स यानं 19 वं षटक टाकलं. या षटकात त्यानं फक्त सात धावा खर्च केल्या अन् एक विकेट घेतली. 18 षटकात नटराजन यानेही फक्त सात धावा खर्च करत एक विकेट घेतली. हेटमायर, पॉवेल अन् ध्रुव जुरेल यासारखे धुरंधर हैदराबादच्या भेदक माऱ्यासमोर बाद झाले.