Delhi Capitals, IPL 2023 : दिल्ली कॅपिटलने आज काही महत्वाच्या घोषणा केल्या आहे. डेविड वॉर्नर याला नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. तर अक्षर पटेल याला उप कर्णधारपद दिले आहे.  तर भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्याकडे 'डायरेक्टर ऑफ क्रिकेट' ही जबाबदारी दिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्वीट करत याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, सौरव गांगुलीने 2019 मध्ये दिल्ली संघाचं मेंटॉरपद सांभाळले होते. आता तो 'डायरेक्टर ऑफ क्रिकेट' म्हणून काम पाहणार आहे. 


गांगुली काय म्हणाला?


'डायरेक्टर ऑफ क्रिकेट' म्हणून नियुक्त झाल्यानंतर सौरव गांगुली म्हणाला की, दिल्ली कॅपिटल्सच्या चमूमध्ये परतल्यानंतर आनंदी आहे.  एसए20 आणि डब्‍ल्‍यूपीएल मध्ये दिल्ली फ्रेंचायजीसोबत काम केलेले आहे.


महिला टीम आणि प्रीटोरिया कॅपिटल्‍ससोबत गेले काही महिने शानदार राहिले आहेत. आयपीएलच्या पुढील हंगामाकडे माझं लक्ष आहे. दिल्लीचा संघ या स्पर्धेत दमदार कामगिरी करेल, अशी आपेक्षा आहे, असे गांगुली म्हणाले. 







डेविड वॉर्नर काय म्हणाला?


दिल्ली संघाचे नेतृत्व सांभाळल्यानंतर डेविड वॉर्नर म्हणाला की,  'ऋषभ पंत दिल्ली फ्रेंचायजीसाठी शानदार कर्णधार राहिला आहे. आम्हाला सर्वांना त्याची कमी जाणवेल. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल संघ व्यवस्थापनाचे आभार... दिल्लीचा संघ माझ्यासाठी नेहमीच घरच्यासारखा राहिला आहे. सर्व प्रतिभावंत खेळाडूंचं नेतृत्व करण्यास मी उत्सुक आहे. 





वॉर्नर दुसऱ्यांदा करणार नेतृत्व -


डेविड वॉर्नर आयपीएलच्या करिअरमध्ये दुसऱ्यांदा दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे. 2009 ते 2013 यादरम्यान वॉर्नर दिल्ली संघाचा सदस्य होता. अखेरच्या काही सामन्यात वॉर्नरने दिल्ली संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्यानंतर तो सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधारही राहिलाय.  SRH ने 2014 मध्ये वॉर्नरला खरेदी केले होते. त्यानंतर पुढील हंगामात वॉर्नरकडे नेतृत्व सोपवलं होतं. 2016 मध्ये वॉर्नरने एकट्याच्या जिवावर हैदराबादला अंतिम सामन्यापर्यंत नेहले होते. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारामध्ये (जिंकलेले सामने) वॉर्नर संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये 69 सामन्यात नेतृत्व केलेय, यामधील 35 सामन्यात विजय तर 32 सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. ऋषभ पंतच्या अनुपस्थित आता डेविड वॉर्नर दिल्लीच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ कशी कामगिरी करतो? याकडे आयपीएल प्रेमींचं लक्ष लागलेय.