Sikandar Raza in IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 21 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा (PBKS) संघ लखनौ सुपर जायंट्सवर (LSG) वरचढ ठरला. पंजाब किंग्जने रोमहर्षक लढतीत लखनौ सुपर जायंट्सचा दोन गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात सिकंदर रझाने उत्तम गोलंदाजी आणि फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. लखनौविरुद्धच्या सामन्यात पंजाबसमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य होतं. हे लक्ष्य पंजाबनं शेवटच्या षटकात पूर्ण केलं. पंजाब किंग्जकडून सिकंदर रझाने (Sikandar Raza) अप्रतिम खेळ दाखवत 57 धावांची चमकदार खेळी केली. यामुळेच अटीतटीच्या लढतीत पंजाबने लखनौवर दोन विकेटने विजय मिळवला.


आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू


लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात सिकंदर रझाने शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गोलंदाजी करताना रझाने 2 षटकांमध्ये 19 धावा देऊन एक बळी घेतला, तर दुसरीकडे फलंदाजी करताना त्याने 41 चेंडूत 57 धावांची दमदार खेळी केली. यावेळी त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. सिकंदर रझा हा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सिकंदर रझा हा आयपीएलमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा पहिला झिम्बाब्वेचा क्रिकेटर आहे. रझाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सध्याच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असल्याचं सिद्ध केलं आहे.






Who is Sikandar Raza : कोण आहे सिकंदर रझा?


मूळचा पाकिस्तानात जन्म झालेला सिकंदर रझा हा झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू आहे. सिकंदर रझाचा जन्म 24 एप्रिल 1986 रोजी पाकिस्तानातील सियालकोट येथे झाला. 2002 मध्ये तो पाकिस्तान सोडून संपूर्ण कुटुंबासह झिम्बाब्वेला गेला होता. झिम्बाब्वेमध्ये गेल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि त्यामुळे तो निवड समितीच्या नजरेत आला. सुरुवातीला त्याला नागरिकत्वाचा त्रास झाला होता, पण त्याला 2011 मध्ये झिम्बाब्वेचं नागरिकत्व मिळालं.


Sikandar Raza International Carrier : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिकंदर रझाची कामगिरी


36 वर्षीय खेळाडू सिकंदर रझा याची गणना झिम्बाब्वेच्या दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. रझाने झिम्बाब्वेसाठी 63 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 1185 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीतही चमकदार कामगिरी करताना त्याने 36 विकेट्स घेतल्या आहेत.


एकदिवसीय सामन्यांमध्ये सिकंदर रझा झिम्बाब्वेसाठी 123 एकदिवसीय सामने खेळला आहे. यामध्ये त्याने सहा शतकं आणि 20 अर्धशतकांच्या मदतीनं 3656 धावा केल्या आहेत. या अष्टपैलू खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्येही 70 विकेट घेतल्या आहेत. 


सिकंदर रझाने कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत झिम्बाब्वेसाठी 17 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एक शतक आणि आठ वेळी अर्धशतकी खेळी करत 1187 धावा केल्या आहेत. रझाने कसोटीत 34 बळी घेतले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


LSG vs PBKS Match Highlights : सिकंदरची अष्टपैलू खेळी, शाहरुखचा फिनिशिंग टच; पंजाबचा लखनौवर दोन विकेटने विजय