Shreyas Iyer Angry on Shashank Singh : पंजाब किंग्सनं क्वालिफायर टू सामन्यात मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्सनी पराभव करून, दुसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. मुंबईनं विजयासाठी दिलेलं 204 धावांचं आव्हान पंजाबनं सहा चेंडू राखून पार केलं. त्यामुळं यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब अशी फायनल पाहायला मिळेल. या दोन्ही संघांनी एकदाही आयपीएल जिंकलेली नाही, हे विशेष.

कर्णधार श्रेयस अय्यरने 41 चेंडूंत केलेली नाबाद 87 धावांची खेळी पंजाबच्या विजयात निर्णायक ठरली. त्याने निहाल वढेराच्या साथीने चौथ्या विकेटसाठी रचलेली 84 धावांची भागीदारी मोलाची ठरली. वढेराने 48 धावांची खेळी उभारली. त्याआधी, या सामन्यात मुंबई इंडियन्सने 20 षटकांत सहा बाद 203 धावांची मजल मारली होती. मुंबईकडून जॉनी बेअरस्टोने 38, तिलक वर्माने 44, सूर्यकुमार यादवने 44 आणि नमन धीरने 37 धावांची धडाकेबाज खेळी उभारली.

शशांक सिंगवर संतापला श्रेयस अय्यर...

दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये श्रेयस अय्यर संघातील सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करत असताना शशांक सिंगवर संतापतो. मुंबई इंडियन्सविरुद्ध क्वालिफायर-2 मध्ये शशांक सिंग रनआऊट झाला. ही घटना 17 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर घडली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने निष्काळजीपणा दाखवला. शशांक सिंगने मिड-ऑनकडे शॉट मारला आणि एक धाव घेतली, असे वाटत होते की तो ही धाव सहज पूर्ण करेल. पण हार्दिक पांड्याने एका शानदार थ्रोने स्टंप उडवून दिली. रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की शशांक धावत नव्हता तर चालत होता. जरी त्याने डायव्ह मारला असता तरी तो बाद झाला नसता. शशांक सिंगच्या या आळशी वृत्तीने श्रेयस अय्यरला राग आला आणि तो सामन्यानंतर संतापला. 

शानदार खेळी करून पंजाब किंग्जला विजय मिळवून दिल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानावर विरोधी संघ आणि त्याच्या संघाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करत होता.  शशांक सिंगला वाटले की अय्यर त्याची चूक माफ करेल, परंतु कर्णधार खूप रागावला. शशांक त्याच्या समोर येताच त्याने त्याच्याशी हस्तांदोलन केले नाही, उलट तो बरेच काही बोलला. व्हिडिओ पाहून असे दिसते की श्रेयस अय्यर देखील शशांक सिंगला शिवीगाळ करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे.

अंतिम फेरीत पंजाब किंग्ज आणि आरसीबीशी भिडणार...

आयपीएल 2025च्या अंतिम फेरीत पंजाब किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. हा ब्लॉकबस्टर सामना मंगळवारी (02 जून) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ गेल्या 17 वर्षांपासून आयपीएल ट्रॉफीसाठी आसुसले आहेत. आता हे निश्चित आहे की एक संघ पहिल्यांदाच चॅम्पियन बनेल.