MS Dhoni LSG vs CSK IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स भन्नाट फॉर्मात आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईने सहा सामन्यात चार विजयाची नोंद केली. एमएस धोनीही भन्नाट फॉर्मात असून अखेरच्या षटकात चौकार आणि षटकार मारत आहे. मुंबई इंडियन्सविरोधात धोनी फक्त चार चेंडू खेळला, पण त्यामध्ये त्यानं 20 धावांची लूट केली. याच 20 धावांनी चेन्नईचा विजय झाला. म्हणजेच, धोनीनं काढलेल्या धावा सामन्यात निर्णायक ठरल्या. आता चेन्नईचा पुढील सामना 19 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरोधात होणार आहे. या सामन्याआधीच वातावरण तापलेय. लखनौमध्ये धोनीसाठी खास पोस्टर लागले आहेत. चाहत्यांनी धोनीच्या स्वागतासाठी लावलेल्या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. लखनौ सुपर जायंट्सनेही हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रस्त्याच्या बाजूला लागलेल्या पोस्टरवर एमएस धोनीसाठी खास मेसेज लिहिण्यात आलाय. धोनीनं अखेरच्या चेंडूवर सिक्स मारावा, पण तेव्हा चेन्नईला विजयासाठी 12 धावांची गरज असावी.. या पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. धोनीनं वानखेडेवर षटकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. याची आठवण या पोस्टरनंतर चाहत्यांमध्ये झाली आहे. लखनौमध्ये लागलेल्या अन्य एका पोस्टरवरही भन्नाट वाक्य लिहिण्यात आले आहे. धोनी चांगला खेळावं असं आम्हाला वाटतेय. पण सामना लखनौनं जिंकावा.. असा पोस्टरही लखनौच्या रस्त्यावर झळकला आहे. लखनौ संघाकडून हे पोस्टर लावण्याचे दिसतेय. त्याशिवाय लखनौ आणि चेन्नई यांच्यामध्ये होणारा सामना यंदाच्या हंगामातील 34 वा सामना आहे. यावरुनही पोस्टरमध्ये खास मेसेज लिहिलाय. 3+4 = 7 फक्त धोनीसाठी... असं म्हटले गेलेय.
यंदाच्या हंगामात धोनीचा शानदार फॉर्म पाहायला मिळत आहे. धोनीनं फक्त तळाला फलंदाजी केली आहे. पण त्या कालावधीमध्ये त्यानं सर्वांची मनं जिंकली आहे. धोनीनं दिल्लीविरोधात नाबाद 37 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय मुंबईविरोधात धोनीनं निर्णायक 20 धावा चोपल्या होत्या. हैदराबाद आणि कोलकात्याविरोधातही धोनी नाबाद परतला होता.