Richest Cricket League : आयपीएल जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा आहे. जगभरातील इतर क्रिकेट लीगच्या तुलनेत आयपीएलमध्ये खूप पैशांचा पाऊस पडतो. अनेक क्रिकेटर कोट्यवधींची कमाई करतात.. त्याशिवाय इतर अनेक बाबीमध्ये आयपीएल जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. पण आता आयपीएलपेक्षाही भव्यदिव्य क्रिकेट लीग स्पर्धा सुरु करण्याचे सौदी अरेबिया प्लॅनिंग करत आहे. यासाठी ते बीसीसीआय आणि आयपीएल संघ मालकाची मदत घेणार असल्याचे समजतेय. विशेष म्हणजे, सौदी अरेबियातील या लीगमध्ये भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेटपटू एकत्र खेळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाला क्रिकेट लीग सुरु करण्यासाठी बीसीसीआय मदत करणार आहे. नुकतीच जय शाह, आशिष शेलार, राजीव शुक्ला यांची एक बैठक झाल्याचे समोर आलेय. यामध्ये सौदीमधील श्रीमंत राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचे समजतेय.
The Sydney Morning Herald आणि The Age या प्रसारमाध्यमांनी सौदी जगातील सर्वात भव्यदिव्य क्रिकेट लीग सुरु करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त दिले आहे. तसेच त्यांना बीसीसीआय आणि आयपीएल संघ मदत करणार असल्याचेही समोर आलेय. सौदी अरेबियाला या लीगसाठी आयसीसीची परवानगी घ्यावी लागणार आहे. सौदी अरेबिया सरकार क्रिकेट लीगसाठी बीसीसीआय आणि आयपीएल संघ मालकांसोबत चर्चा करत आहे.
सध्या बीसीसीआयकडून भारतीय खेळाडूंना इतर क्रिकेट लीगमध्ये खेळण्यावर बंदी आहे. पण सौदी अरबने क्रिकेट लीगची घोषणा केल्यानंतर बीसीसीआय आपल्या नियमांत बदल करु शकते. द एजच्या एका रिपोर्ट्सनुसार, मागील एक वर्षापासून सौदी अरब आपल्या देशात क्रिकेट लीगची चर्चा करत आहे. जगभरात क्रिकेट लीग सुरु करण्यात येत असेल आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळत असतील तर आयसीसीची परवानगी घ्यावी लागते. सौदी अरब बीसीसीआय आणि आयपीएल संघमालकासोबतच्या चर्चेनंतर आयसीसीकडूनही परवानगी घ्यावी लागणार आहे.
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी याआधीच सौदी क्रिकेटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी तयार असल्याचे सांगितेल होते. फूटबॉल आणि एफ 1 यासारख्या खेळामध्ये पैसे गुंतवल्यानंतर सौदी क्रिकेटमध्ये पैसे गुंतवण्यास इच्छुक असल्याचे बार्केले म्हणाले होते. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार सौदी क्रिकेटच्या माध्यमातून भारतासोबतचे संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. सौदी 2030 पर्यंत भारतीयांसाठी आघाडीचे पर्यटनस्थळ होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात आयपीएल सौदीमध्येच आयोजित करण्यात आले होते.