RCB vs PBKS Match Report : करो या मरो च्या सामन्यात आरसीबीने पंजाबचा 60 धावांनी दारुण पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या 92 धावांच्या बळावर 241 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल पंजाबचा संघाचा डाव 261 धावांवर संपुष्टात आला. या पराभवामुळे पंजाबचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. दुसरीकडे आरसीबीचं यंदाच्या हंगामात आव्हान अद्याप जिवंत आहे. पंजाबकडून फक्त रायली रुसो यानेच प्रतिकार केला. रुसोने 61 धावांची खेळी केली. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. आरसीबीचा हा यंदाच्या हंगामातील पाचवा विजय ठरला. आरसीबीचे 12 सामन्यात पाच विजय झाले आहेत. तर पंजाबचा 12 सामन्यातील आठवा पराभव झाला. पंजाब आठ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.
आरसीबीने दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज प्रभसिमरन फक्त सहा धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर जॉनी बेयरस्टो आणि रायली रुसो यांनी पंजाबसाठी फटकेबाजी केली. पॉवरप्लेमध्ये पंजाबने धावांचा पाऊस पाडला. पंजाबने पहिल्या सहा षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात 75 धावा चोपल्या होत्या. जॉनी बेयरस्टो 16 चेंडूत 27 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत एक षटकार आणि चार चौकार ठोकले.
एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला रायली रुसो वादळी फलंदाजी करत होता. रुसो यानं 27 चेंडूमध्ये 61 धावांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या खेळीमध्ये तीन षटकर आणि नऊ चौकार ठोकले. रुसोने जॉनी बेयरस्टो आणि शशांक सिंह यांच्यासोबत भागिदारी करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. पण रुसो बाद झाल्यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या.
महत्वाच्या क्षणी शशांक सिंह धावबाद झाला. विराट कोहलीने टाकलेल्या अचूक थ्रोमुळे फॉर्मात असलेल्या शशांक सिंह याला तंबूत जावं लागलं. शशांक सिंह याने 19 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीमध्ये दोन षटकार आणि चार चौकार ठोकले. जितेश शर्मा 5 आणि लियाम लिव्हिंगस्टोन याला खातेही उघडता आले नाही. एकापाठोपाठ एक विकेट पडल्यामुळे पंजाबची फलंदाजी ढेपाळली. सॅम करन याने 16 चेंडूत 22 धावांची खेळी केली. त्यामध्ये दोन चौकार ठोकले. आषुतोश शर्मा फक्त आठ धावा काढून बाद झाला. हर्षल पटेल यालाही खाते उघडता आले नाही. अर्शदीप सिंह चार दावा काढून बाद झाला.
आरसीबीकडून मोहम्मद सिराज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. सिराजने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. स्वप्निल सिंह, लॉकी फर्गुसन आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.