Sri Lanka Sqaud For T20 World Cup 2024  : टी20 विश्वचषकासाठी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली आहे. अष्टपैलू वानिंदु हसरंगा याच्या नेतृत्वात श्रीलंकेचा संघ विश्वचषकात उतरणार आहे. तर चॅरिथ असलांका याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या मथीशा पथिराना आणि महीश तिक्ष्णा यासारख्या युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्याशिवाय अनुभवी अँजलो मॅथ्यूज यालाही विश्वचषकाच्या संघात स्थान दिलेय.


या खेळाडूंवर श्रीलंकेची मदार, कुणाला मिळाली संधी ?


टी20 विश्वचषकासाठी श्रीलंकेने अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधला आहे. चॅरिथ असलांका याच्याशिवाय कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदु मेंडिस आणि सदीरा समरविक्रमा या फलंदाजांवर खास मदार असेल. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डी सिल्वा आणि वानिंदु हसरंगा यांच्यावरही मोठी जबाबदारी असेल. गोलंदाजीची धुरा महीश तिक्ष्णा, डुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथीशा पथिराना आणि दिलशान मदुशंका यांच्यावर असेल. 


टी20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेचा संघ -


वानिंदु हसरंगा (कर्णधार), चॅरिथ असलांका (उप-कर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदु मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डी सिल्वा, महीश तिक्षाना, डुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथीशा पथिराना आणि दिलशान मदुशंका






दोन जून 2024 पासून टी20 विश्वचषकचा महासंग्राम सुरु होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 20 संघाचा सहभाग असेल. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यंदाचा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशात होणार आहे. श्रीलंकेचा संघ ड ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघही आहे.  भारतीय संघाचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे.


विश्वचषकाचा गट असा असेल -


अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ