PBKS vs RCB IPL 2024 : रनमशीन विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 241 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीने 92 तर पाटीदार याने 55 धावांची खेळी केली. त्याशिवाय कॅमरुन ग्रीन याने 46 धावांचे योगदान दिले. पंजाबकडून हर्षल पटेल यानं तीन विकेट घेतल्या. पंजाबला विजयासाठी 242 धावांचे आव्हान मिळाले आहे.
आरसीबीची खराब सुरुवात -
पंजाबचा कर्णधार सॅम करन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धर्मशालाच्या मैदानावर आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार फॅफ डु प्लेसिस आणि विल जॅक्स स्वस्तात तंबूत परतले. पंजाबकडून पदार्पण करणाऱ्या विद्वात कवेरप्पा यानं आरसीबीला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. त्याने फाफ डु प्लेलिस आणि विल जॅक्स यांना स्वस्तात तंबूत परतले. फाफ डु प्लेलिस यानं 7 चेंडूमध्ये दोन चौकारांच्या मदतीने 9 धावा केल्या. तर विल जॅक्स याने सात चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 12 धावा केल्या. एकीकडे विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला विराट कोहली खंबीरपणे फलंदाजी करत राहिलाय.
रजत पाटीदारचा झंझवात -
विराट कोहलीने रजत पाटीदारच्या साथीने आरसीबीच्या डावाला आकार दिला. दोघांनी 32 चेंडूमध्ये 76 धावांची झंझावती भागिदारी केली. पाटीदार बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन याच्यासोबत 46 चेंडूमध्ये 92 धावांची भागिदारी केली. विराट कोहलीच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने मोठी धावसंख्या उभारली. रजत पाटीदार यानं आरसीबीच्या धावसंख्येला वेग दिला. पाटीदार याने फक्त 23 चेंडूमध्ये 55 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये रजत पाटीदारने सहा खणखणीत षटकार ठोकले, तर तीन चौकार लगावले. रजत पाटीदारने 240 च्या नटरनेटने धावांचा पाऊस पाडला.
विराट कोहलीचं शतक हुकले -
रजत पाटीदार बाद झाल्यानंतर विराट कोहलीने मोर्चा संभाळला. कॅमरुन ग्रीनसोबत कोहलीने डावाला आकार दिला. विराट कोहलीने वादळी 92 धावांची खेळी केली. त्याचं शतक फक्त 8 धावांनी हुकले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीने 196 च्या स्ट्राईक रेटने 47 चेंडूमध्ये 92 धावांची खेळी केली. रनमशीन विराट कोहलीने सहा षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला.
कॅमरुन ग्रीन-दिनेश कार्तिकचा फिनिशिंग टच -
दिनेश कार्तिक यानं अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. कार्तिकने सात चेंडूमध्ये दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 18 धावांचे योगदान दिले. लोमरोर याला फटकेबाजी करता आली नाही. त्याला खातेही उघडता आले नाही. स्वप्निल सिंह एका धावेवर नाबाद राहिलाय. कॅमरुन ग्रीन यानं 27 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने एक षटकार आणि पाच चौकार ठोकले.
पंजाबची गोलंदाजी -
हर्षल पटेल यानं अखेरच्या षटकात भेदक मारा केला. हर्षल पटेल यानं अखेरच्या षटकात तीन धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. विद्वात कवेरप्पा यानं पदार्पणात भेदक मारा केला. कवेरप्पा याने पॉवरप्लेमध्येच दोन विकेट घेतल्या. त्याने चार षटकात 36 धावा खर्च करत डु प्लेलिस आणि विल जॅक्स यांना बाद केले. अर्शदीप सिंह याने 3 षटकात 41 धावा खर्च करत एक विकेट घेतली, तर सॅम करन याने तीन षटकात 50 धावा खर्च करत एक विकेट घेतली. लियाम लिव्हिंगस्टोन याने 3 षटकात 28 धावा खर्च केल्या. राहुल चाहर याने तीन षटकात 47 धावा खर्च केल्या.