Riyan Parag Record : आयपीएल 2022 च्या 39 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 145 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येला प्रत्युत्तरात देताना बंगळुरुचा संघ 115 धावांत ऑलआऊट झाला. रियान परागने राजस्थानसाठी चांगली कामगिरी केली. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. यासोबतच त्याने क्षेत्ररक्षणातही कमाल दाखवली. परागने 4 झेल घेतले. या सामन्यात रियानच्या नावावर खास विक्रमही झाला आहे.


राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रियान हा आयपीएलच्या कोणत्याही एका सामन्यात अर्धशतकांसह चार झेल घेणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. परागने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यात 31 चेंडूमध्ये त्याने 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 56 धावा केल्या. यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या चार खेळाडूंचे झेल घेतले. यासह त्याने त्याने आयपीएलमध्ये हा खास विक्रम केला आहे.


परागच्या आधी केवळ दोनच खेळाडूंना आयपीएलमध्ये अर्धशतकांसह एका सामन्यात चार झेल घेता आले आहेत. त्याच्या आधी जॅक कॅलिसने आयपीएल 2011 मध्ये हा विक्रम केला होता. केकेआर आणि डेक्कन चार्जेस यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात कॅलिसने ही कामगिरी केली होती. त्याचवेळी अॅडम गिलख्रिस्टनेही आयपीएल 2012 मध्ये ही कामगिरी केली होती. पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात गिलख्रिस्टने हा विक्रम केला होता.


दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना  राजस्थान रॉयल्सने 20 षटकांमध्ये 8 गड्यांच्या मोबदल्यात 144 धावांचे लक्ष रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसमोर ठेवले होते. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना बंगळुरूचा संघ 19.3 षटकांमध्ये सर्वबाद झाला. बंगळुरुच्या खेळाडूंना केवळ 115 धावा करता आल्या. संघाकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 23 धावा केल्या.


महत्त्वाच्या बातम्या: